अहमदनगर : राज्यातील राष्ट्रवादी व भाजपाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना अहमदनगर महापालिकेत मात्र हे दोन्ही पक्ष मंगळवारी जाहीरपणे एकत्र आले. स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे यांचे चिरंजीव संजय ढाेणे, नगरसेविका वंदना ताठे यांचे पती विलास ताठे, नगरसेवक रामदास आंधळे ही भाजपची मंडळीही उपस्थित होती. महापौर वाकळे यांच्यासह पदाधिकारी नगरसेवकांनी हजेरी लावत घुले यांच्या उमेदवारीला एकप्रकारे पाठिंबा दिला आहे.
महापालिकेत स्थायी समिती सभापतीसाठी अविनाश घुले यांनी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर दाखल केला. स्थायी समितीचे सदस्य घुले हे जरी राष्ट्रवादीचे असले तरी त्यांचा अर्ज दाखल करताना महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांनीही हजेरी लावली. बसपाच्या कोट्यातून आलेले मुद्दसर शेख हे तर सुरुवातीपासून घुले यांच्यासोबत होते. नगरसचिव कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेऊन विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या दालनात सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. विरोधी पक्षनेते बारस्कर हे राष्ट्रवादीचे आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी घुले यांनी फोनवरून सर्वांशी संपर्क साधला. महापौर वाकळे हे आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला गेला. घुले यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महापौर वाकळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक हजर असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा सामना सध्या अधिवशेनाच्या निमित्ताने रंगला आहे. अधिवेशनात भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कमालीचा संघर्ष सुरू असून, अहमदनगर महापालिकेत मात्र भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाला पाठिंबा दिला. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे मनोज कोतकर यांना राष्ट्रवादी प्रवेश देऊन त्यांना सभापती करण्यात आले. कोतकर हे राष्ट्रवादीतून सभापती झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलीच आदळाआपट केली. कोतकर यांना तुम्ही नेमके कुणाचे आहात याचा लेखी खुलासा करावा, अशा आशयाची नोटीस त्यांना बजावली गेली. यावेळी तर उघडपणे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या घुले यांचा अर्ज दाखल करताना हजेरी लावली. यावर मात्र भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाने एकप्रकारे राष्ट्रवादीच्या घुले यांना पाठिंबा दिल्याचेच यावरून उघड होते.
...
महापालिकेत सेना पुन्हा एकाकी
स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे घुले यांचा अर्ज दाखल करताना महापौरांसह भाजपाच्या नगरसेवकांनी हजेरी लावली. बसपाचे मुद्दसर शेख हेही उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवकही उपस्थित होते. सेनेकडून मात्र कुणीही उपस्थित नव्हते. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीतून सेनेने माघार घेतली. त्यावेळीही सेना एकाकी पडली. यावेळीही सेनेला सभापती पदापासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, बसपा, भाजप हे चारही पक्ष एकत्र आल्याने सेना पुन्हा एकाकी पडली आहे.
.......
घुलेंना मुद्दसर शेख सूचक, तर सुप्रिया जाधव अनुमोदक
स्थायी समिती सभापती पदासाठी घुले यांनी दोन अर्ज दाखल केले. यापैकी एका अर्जासाठी बसपाचे मुद्दसर शेख हे सूचक असून, प्रकाश भागानगरे हे अनुमोदक आहेत. दुसऱ्या अर्जासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक सागर बोरुडे सूचक असून, अनुमोदक म्हणून सुप्रिया धनंजय जाधव यांची स्वाक्षरी आहे.