अहमदनगर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी भाजपने ऐनवेळी खेडकर व आठवले यांचे उमेदवारी अर्ज दाखल करत महाविकास आघाडी समोर आव्हान निर्माण केले आहे. भाजपचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या सावेडीतील संपर्क कार्यालयात राधाकृष्ण विखे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्यासह भाजप सदस्यांची बैठक सकाळी ११ वाजता झाली. भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी भाजपच्या उमेदवारांसाठी ऐनवेळी बारा वाजता उमेदवारी अर्ज घेतले. हे अर्ज घेऊन ते संपर्क कार्यालयात आले. संपर्क कार्यालयात बैठक सुरू होती. या बैठकीत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल कोण करणार, याबाबत मोठ्या नेत्यांमध्ये एकमत होत नव्हते. बºयाच वेळानंतर खेडकर व आठरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर वाघचौरे यांनी खेडकर व आठरे यांचा अर्ज भरून दोन्ही उमेदवारांसह ते जिल्हा परिषदेत पोहोचले. जिल्हा परिषदेत त्यांनी खेडकर व आठरे यांचे अर्ज दाखल केले. या निवडणुकीत विखे यांची भूमिका महत्त्वाची आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसमधील विखे गट भाजप सोबत राहील, असा शब्द त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्यावेळी विखे गट भाजपच्या बाजूने मतदान करणार की त्यांच्या पक्षाचा अधिकृत गटनेता अजय फटांगरे यांनी दिलेला पक्ष आदेश पाळणार, याची उत्सुकता आहे. काँग्रेसमधील विखे गटाने भाजपच्या बाजूने मतदान केल्यास तो पक्षादेशाचा भंग ठरेल. तसेच विखे यांच्या गटातील सदस्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्यास ते भाजपच्याही पक्षादेशाचा भंग होईल. त्यामुळे या निवडणुकीकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून अध्यक्षपदासाठी सुनिता अशोक खेडकर तर उपाध्यक्षपदासाठी संध्या आठरे यांचा अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 1:15 PM