Radhakrusna Vikhe Patil ( Marathi News ) : अहमदनगरच्या राजकारणातील जुने राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने आपल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांची खिल्ली उडवल्यानंतर थोरात यांच्या टीकेला भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "आमच्या मुलाचा कोणता छंद पुरवायचा आणि काय करायचं, हे मला त्यांनी शिकवण्याची गरज नाही. तुम्ही राजकारणात तुमचं कुटुंब उतरवलंच आहे. तुमच्या घरातल्या मुला-मुलींचा छंद पुरवला तो चालतो. दुसऱ्याच्या मुलाची कशाला काळजी करता?" असा खोचक प्रश्न विखे यांनी विचारला आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुजय विखे यांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं गेल्या अनेक वर्षांपासून नेतृत्व करत असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी खोचक टोला लगावला होता. "मोठ्या कुटुंबातील लाडकं लेकरू आहे. त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे. हा छंद पक्षाने नाही तर तो पालकाने पुरवला पाहिजे. दोन मतदारसंघांतून लढवण्यासाठी इच्छुक आहे, असं ते म्हटले होते. त्यांचा छंद पुरवण्यासाठी ते दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात. यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल," असं थोरात म्हणाले.
याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "संगमनेरमध्ये दहशतीचं राजकारण सुरू आहे. तालुक्यात हुकूमशहा तयार झाला आहे. तालुका पूर्णपणे उद्ध्वस्त केला असून ठराविक लोकांचा विकास झाला आहे. त्यामुळे तालुक्याला नवीन चेहरा हवा, अशी आता लोकभावना झाली असून या लोकभावनेचा कसा आदर करायचा, हे पक्षश्रेष्ठींना कळवू," असं म्हणत राधाकृष्ण विखेंनी अप्रत्यक्षरीत्या आपण सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
सुजय विखे नक्की काय म्हणाले होते?
विधानसभा निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील यांनी म्हटलं होतं की, "उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदारसंघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकारण खूप क्लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्यात अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्त अर्ज करण्याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार," अशी भूमिका सुजय विखेंनी मांडली होती.