लोणी: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकल्याने हातात बेड्या पडू नयेत, म्हणूनच काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाला चिकटून राहिले आहेत. प्रतिमा सुधारण्यासाठी काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडले पाहिजे, असे भाजपने म्हटले आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांच्यावर झालेली ईडी कारवाई, संजय राऊतांची आरोपबाजी यांसारख्या विविध मुद्द्यांवर रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसच्या सहा मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होत असलेल्या संभाव्य बदल्यांच्या चर्चेवर भाष्य करत काँग्रेसला खोचक सल्ला दिला आहे.
सत्तेतून बाहेर पडलो तर बेड्या पडतील
काँग्रेसला आपली प्रतिमा सुधारायची असेल तर आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे. मात्र, भ्रष्टाचाराच्या विळख्यात ते अडकले आहेत. मंत्री राहिलो तर संरक्षण मिळेल आणि सत्तेतून बाहेर पडलो तर बेड्या पडतील, अशी भीती त्यांना सतावत आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार नाही. यावरून काँग्रेसच्या सध्याच्या नेत्यांना पक्षाच्या भवितव्याची चिंता नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोपाचा इन्कार करत, केवळ आपले अपयश झाकण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होतील, अशी भीती असल्यानेच जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे, या शब्दांत विखे-पाटील यांनी निशाणा साधला.
दरम्यान, संजय राऊतांकडून भाजपवर होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना, आधार नसलेली बेताल वक्तव्य करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. सततच्या चौकशीमुळे संजय राऊत अडचणीत आले आहेत. उद्या आपल्यावर कारवाई होईल या भीतीने संजय राऊत हे बेताल वक्तव्य करत आहेत, असा पलटवार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.