अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या विरोधात जिल्हाभरात दुस-या दिवशीही आंदोलने सुरुच असून भाजपावरही जोरदार टीका या आंदोलनांमधून केली जात आहे. जिल्हाभरात ठिकठिकाणी बंद पाळून व मोर्चे काढून भाजप आणि छिंदमचा निषेध केला जात आहे. नगर महापालिकेत छिंदम याचे नाव असलेले फलक शिवसैनिकांनी फाडून टाकले. दरम्यान परिस्थिती चिघळू नये, म्हणून तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.छिंदमच्या विरोधात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे गावातून तरुणांनी मोर्चा काढला. विसापूर परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवून छिंदम व भाजपचा निषेध करण्यात आला. विसापूर येथे छिंदम याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच गावात निषेध सभा घेण्यात आली. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच छिंदमच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. छिंदम याच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
नेवाशात पोलीस ठाण्यात ठिय्या
नेवासा येथे राष्ट्रवादी काँगे्रस, क्रांतीकारी शेतकरी पक्ष, काँगे्रस तसेच शिवप्रेमी संघटनांनी गणपती मंदिर चौकात छिंदम याचा पुतळा जाळला़ त्यानंतर सर्व जमाव मोर्चाद्वारे तहसील कार्यालयावर पोहोचला़ तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा पोलीस ठाण्यावर पोहोचला़ तेथे छिंदम याच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा मोर्चेकºयांनी दिला़ वकील संघटनेनेही छिंदम याच्या विरोधात फिर्याद दाखल करुन घेण्यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु केले़ पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे छिंदम याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
भिंगारमध्ये कडकडीत बंद
छिंदम याच्याविरोधात शुक्रवारी भिंगार शहरात विविध संघटनांनी रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार सर्वांनी दुकाने बंद ठेवत कडकडीत बंद पाळला. छिंदम याच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध केला. अनुसूचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून भिंगारमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.