अहमदनगर : प्रभाग ११ आणि १५ मधील पोटनिवडणुकीसाठी भाजप-सेनेत युती झाली असून राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवशी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अजिंक्य बोरकर व अनिता भोसले हे दोघे नगरसेवक अपात्र ठरल्यामुळे या दोन प्रभागात १० जानेवारी रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी शेवटची मुदत होती. प्रभाग ११ मध्ये आठ तर प्रभाग १५ मध्ये पाच उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाले. सार्वत्रिक निवडणुकीत जागा वाटपात सेनेच्या कोट्यात गेलेली प्रभाग १५ मधील जागा भाजपने घेतली आहे. तेथे भाजपकडून कोमल नाना साबळे यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग १५ मधून राष्ट्रवादीच्यावतीने भारती एकनाथ भोसले व कॉँग्रेसच्या शीला दीप चव्हाण यांनी सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय सोनम अरुण वैरागर, मीना विजय वडांगळे, राधिका सुदाम साठे यांनीही प्रभाग १५ मध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग ११ मध्ये राष्ट्रवादीच्यावतीने शोभा सुधाकर बोरकर तर कॉँग्रेसच्यावतीने रॉबीन साळवे यांनी सोमवारीच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. युतीच्या जागा वाटपात ही जागा सेनेने लढविण्याचे ठरले. अपेक्षेप्रमाणे योगीराज शशिकांत गाडे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र सेनेचेच अशोक दहिफळे यांनीही या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून सुजीत खरमाळे, युवराज पोटे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, जागा वाटपात हा प्रभाग सेनेला सोडण्यात आल्याने हे दोघेही पक्षाचे म्हणून रिंगणात नसणार, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी सांगितले. याशिवाय प्रभाग ११ मध्ये बाळासाहेब रामभाऊ पुंड, चंद्रकांत सूर्यभान शेळके, प्रशांत गर्जे, रोहिदास दडवंते यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-कॉँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहेत. भाजप-सेनेने मात्र स्वतंत्र न लढता युती करूनच लढण्याचा निर्णय घेतला. आघाडीत बिघाडी झाल्याने दोन्ही प्रभागात आता तिरंगी लढत होणार आहे. याशिवाय काही अपक्षही निवडणूक रिंगणात राहतील. बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
भाजपा, सेनेची युती तर दोन्ही कॉँग्रेस स्वतंत्र
By admin | Published: December 22, 2015 11:01 PM