भाजपने खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा; बाळासाहेब थोरात यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 01:12 PM2021-01-19T13:12:56+5:302021-01-19T13:14:09+5:30
राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निकालातून भाजपची पिछेहाट झाल्याचे समोर आले आहे. हे भाजपच्या धोरणांचे अपयश असून त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर केली. त्यांनी केलेला दावा खोटा आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा, अशी टिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर : राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निकालातून भाजपची पिछेहाट झाल्याचे समोर आले आहे. हे भाजपच्या धोरणांचे अपयश असून त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर केली. त्यांनी केलेला दावा खोटा आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा, अशी टिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात सोमवारी (दि. १९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकारवर जनतेचा मोठा विश्वास आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यांत आतापर्यंतच्या निकालावरून काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर आला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीप्रमाणेच जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारूण पराभव करत महाराष्ट्र विकास आघाडीला कौल दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखविला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे यश मिळाले असून ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. विदर्भातील जनतेने काँग्रेसच्या पारड्यात निर्विवाद यश टाकले आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला, येथेही काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणून समोर येईल.