आंदोलनाचा राजकीय लाभ घेणारी भाजप आज अण्णांनाच विसरली - राधाकृष्ण विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2017 09:09 AM2017-01-01T09:09:09+5:302017-01-01T09:09:09+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी युपीए सरकारच्या काळात केलेल्या लोकपाल आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाने राजकीय लाभ घेतला

BJP today has forgotten Anna Hazare, who took political advantage of the agitation - Radhakrishna Vikhe | आंदोलनाचा राजकीय लाभ घेणारी भाजप आज अण्णांनाच विसरली - राधाकृष्ण विखे

आंदोलनाचा राजकीय लाभ घेणारी भाजप आज अण्णांनाच विसरली - राधाकृष्ण विखे

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी युपीए सरकारच्या काळात केलेल्या लोकपाल आंदोलनाचा भारतीय जनता पक्षाने राजकीय लाभ घेतला. मात्र आज सत्तेत आल्यानंतर भाजपला अण्णांचाच विसर पडल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.
विखे यांनी आज राळेगण सिद्धी येथे जाऊन उपोषणावर असलेल्या अण्णा हजारेंची भेट घेतली. प्रकृती खालावत असल्याने अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी या भेटीमध्ये केली. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मागील ५ दिवसांपासून अण्णा हजारे उपोषणाला बसले असताना या आंदोलनाबाबत भाजप-शिवसेना सरकारच्या उदासीन धोरणावर त्यांनी संताप देखील व्यक्त केला. लोकपाल आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा भारतीय जनता पक्षाने राजकीय लाभ उचलला. लोकपाल कायद्याचे त्यांनी राजकीय भांडवल केले. परंतु, २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी मागील पाच वर्षात त्यांनी लोकपालाची नियुक्ती केली नाही. सरकार कोणत्याही विषयांत गंभीर नाही. दिलेल्या प्रत्येक शब्दाचा भाजपला आता विसर पडला असून, त्यांच्या प्रत्येक निर्णयातून जनतेमध्ये विश्वासघाताची भावना निर्माण होत असल्याचे राधाकृष्ण विखे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख, पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेनेवर टीकास्त्र
शिवसेनेला अण्णांची एवढीच काळजी असेल तर त्यांनी आताच्या आता सरकारबाहेर पडायला हवे. अन्यथा लोकांचा शिवसेनेच्या भूमिकेवर विश्वास बसणार नाही, असेही विखे म्हणाले.



 

Web Title: BJP today has forgotten Anna Hazare, who took political advantage of the agitation - Radhakrishna Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.