अहमदनगर : महापालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपकडून महेंद्र गंधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपकडून महापौरांना आज, सोमवारी विनंती पत्र देण्यात येणार असून, त्यानंतर महापौर गंधे यांना पत्र देणार की भाजपला नियुक्ती पत्रासाठी प्रतीक्षा करावी लागणार, याबाबत उत्सुकता आहे.
महापालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपमध्ये एकमत होत नव्हते. त्यामुळे महापालिकेची विरोधी पक्षनेता नियुक्ती लांबणीवर पडली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने भाजपमधील वाद अखेर संपुष्टात आला आहे. विराेधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभापती मनोज कोतकर हेही इच्छुक होते. परंतु, पक्षश्रेष्ठींकडून गंधे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गतवेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली. भाजपने व राष्ट्रवादीने सेनेला सत्तेबाहेर ठेवले. सर्वांत मोठा विरोधी पक्ष शिवसेना होती. परंतु, विरोधी पक्षनेता शिवसेनेला न देता राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांना देण्यात आले होते. गतवेळी विरोधी पक्षनेता पद न देणाऱ्या भाजपचा शिवसेना बदला घेणार की गंधे यांची नियुक्ती करणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा आहे.
महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेसला महापालिकेत एकही पद दिले गेले नाही. त्यामुळे काँग्रेस पूर्णपणे सत्तेबाहेर आहे. काँग्रेसकडून महिला व बाल कल्याण समिती सभापतीची मागणी करण्यात आली हाती. परंतु, शिवसेनेने सभापती पद स्वत:कडे ठेवले. तसेच उपसभापती पदही राष्ट्रवादीने घेतले असून, काँग्रेसला एकही पद मिळाले नाही. आता विरोधी पक्षनेता पदही भाजपला जाणार आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी आहे. अहमदनगर महापालिकेत मात्र सेना व राष्ट्रवादीने सर्व पदे घेतली असून, काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे.
...
घटस्थापनेनंतर पदस्थापना
विरोधी पक्षनेता पदी नियुक्ती केल्याचे पत्र घेऊन पितृपक्ष संपल्यानंतर घटस्थापनेला पदभार घेणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांनी सांगितले. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे या घटस्थापनेला पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी महापालिकेत महत्त्वाच्या पदांचा पदभार स्वीकारला जाणार आहे.