अहमदनगर : येथील पेमराज सारडा महाविद्यालयात सुरू असलेल्या भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत कार्यकर्त्यांंमध्ये चांगलीच जुंपली. कोरोनाच्या काळात पक्षाने काय केले, यावरून हा गोंधळ झाला. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर आणि माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्याच चांगलाच वाद पेटला.
सध्या भाजपचे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाभर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. अहमदनगर शहरातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण रविवारी, आज आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नगर शहरातील चारही मंडलातील कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. कोरोनाच्या भितीने केवळ शंभरच्या आसपास कार्यकर्त्यांनी शिबिराला हजेरी लावली.
ज्येष्ठ नेते प्रा. मधुसूदन मुळे यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी संधी दिली जाणार आहे की नाही? असा सवाल मुकुंद देवगावकर यांनी केला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता बोलण्यासाठी संधी दिली जाईल, असे त्यांनासांगण्यात आले. मात्र वेळेवरून चांगलीच खडाजंगी झाली.
आम्ही कोरोनाच्या काळात खूप काम केले, पक्षाने काय काम केले, ते आधी सांगावे. पक्षामध्ये गुंड प्रवृत्तीचे, गुन्हेगार लोक शिरले आहेत. ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहे, अशांना पदं दिली आहेत. त्यामुळे पक्षशिस्त बिघडली आहे, आणि तुम्ही मात्र पक्षशिस्त काय असते. हे शिकवता, असा सवाल देवगावकर यांनी करताच त्यांच्यावर अनेक पदाधिकारी तुटून पडले. त्यामध्ये कुलकर्णी-देवगावकर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठांनी मध्यस्ती केल्यानंतर वाद मिटला आणि प्रशिक्षण सुरू झाले. सायंकाळी या शिबिराचा समारोप होणार आहे.