अहमदनगर : राज्यातील मंदिरे उघडावीत, या मागणीसाठी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी (२९ आॅगस्ट) सकाळी नगर शहरात घंटानाद आंदोलन केले. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासमोर शहर भाजपचे अध्यक्ष भैय्या गंधे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत घंटानाद झाला.
नगर शहरातील भाजपचे कार्यकर्ते व विविध हिंदुत्ववादी संघटना यांनी नगर शहरातील गणपती मंदिर, हनुमान मंदिरासमोर घंटानाद केला. दारुची दुकाने, मॉल सुरू झाल्याने कोरोना वाढत नाही. मंदिरे सुरू झाल्याने कोरोना वाढेल हा सरकारचा समज चुकीचा आहे. सर्व नियमांचे पालन करून मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. घंटानादनंतर गणरायाची आरती करून सरकारला मंदिरे उघडण्याची बुद्धी दे... असे साकडेही घालण्यात आले.
राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळ उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या वतीने मंगलगेट येथे मारुती मंदिरासमोर घंटा व थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, अनिल गट्टाणी, राजेंद्र गीते, श्याम जाखोटिया, अभिषेक दायमा, बद्री राठी, निकीत खटोड, योगेश जाजू, पारप्पा हरबा, रोहन गट्टाणी, अशोक खीचुसरा आदि सहभागी झाले होते.