अकोले : राज्य सरकारचा आदेश झुगारून पायी पंढरपूरला निघालेल्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोले बाजारतळासमोर भाजप, आध्यात्मिक आघाडी व तालुका वारकरी संघटनेने सोमवारी दुपारी एक तास चक्का जाम आंदोलन केले.
राज्यातील वारकऱ्यांना कोरोना नियमांचे पालन करून पंढरपूर आषाढी वारीला परवानगी द्या, बंडातात्या यांना नजरकैदेतून मुक्त करा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
वारकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष दीपक महाराज देशमुख, माजी आमदार वैभव पिचड, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे, सोनाली नाईकवाडी यांची भाषणे झाली. रस्त्यावर बसून टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग, भजन म्हणत आंदोलन करण्यात आले. गायनाचार्य किरण महाराज शेटे, राजेंद्र महाराज नवले, दीपक महाराज बोऱ्हाडे, आत्माराम महाराज शेळके, योगेेश महाराज कानवडे, दौलत महाराज शेटे, पंचायत समिती सभापती ऊर्मिला राऊत, दत्तात्रय देशमुख, भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, विजय भांगरे, रामनाथ महाराज देशमुख, राजेंद्र गवांदे, बाळासाहेब वडजे, विजय पवार, राहुल देशमुख, सचिन शेटे आदी उपस्थित होते.
...........
मद्यालये सुरू आणि देवालये बंद हे महाआघाडी सरकारचे धोरण योग्य नाही. माणसांचा सरकारवर भरोसा राहिला नाही. देवावर भरोसा आहे. म्हणून देवालये सुरू करावित आणि वारीला परवानगी द्यावी. हजारोच्या संख्येने सभा- संमेलने, नेत्यांचे वाढदिवस, उत्सव होतात. मग वारी बंद का? वारीला खंड पडला तर आघाडी सरकारला दंड पडल्याशिवाय राहणार नाही.
-वैभव पिचड, माजी आमदार, भाजप