अहमदनगर : भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामुळे विरोधी पक्षांतील नेतेमंडळी धास्तावली आहेत. त्यांनी मोदी लाट अडविण्याऐवजी त्या लाटेवरच स्वार होण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यात दक्षिणेतील राष्ट्रवादी आणि उत्तरेतील एका काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या झंझावातात आपली वाताहत होण्याची भीती या नेत्यांना आहे. पराभवाचे विश्लेषण करण्याऐवजी बहुतांशी नेते आपल्या राजकीय पुनर्वसनासाठी कामाला लागले आहेत. भाजपामधील मित्रांचा त्यासाठी उपयोग केला जात आहे. दक्षिणेतील एका नेत्याची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी भाजपाशी निवडणुकीपूर्वीच सलगी केली आहे. मात्र, त्यांच्यावर कडी करण्यासाठी त्या नेत्यानेच भाजपचा थिंक टँक म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांची भेट घेतली. याची गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. एक नेता पत्नीला भाजपाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी कामाला लागला. मात्र, या ‘राज’कारणाला किती यश मिळते. हा काळच ठरविल. उत्तरेतील एका नेत्यालाही कमळाचा सुगंध आवडू लागला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हातात कमळ घेऊन लढण्याची शक्यता आहे. या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यास जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलून जातील. भाजपामधून रूसून गेलेले नेतेही परतीच्या वाटेवर आहेत. निवडणुकीचा अंदाजच न आल्याने त्यांची अशी गोची झाली आहे. तेही खासगीत हे मान्य करीत आहेत. निष्ठावान भाजपा व संघ कार्यकर्त्यांना या परक्यांबद्दल मनात अढी आहे. परक्यांमुळे निष्ठावानांवर गंडांतरांची शक्यता आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) लोढांना आमंत्रण पूर्वाश्रमीचे भाजपावासी असलेल्या वसंत लोढा यांना स्वगृही परतण्याचे निमंत्रण आले आहे. लोढा सध्या मनसैनिक झाले आहेत. त्यांना भाजपात घेऊन जिल्हाध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातही भाजपामधील एक गट सक्रिय झाला आहे. मनसेमध्येही सध्या दोन गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर ते भाजपात जातील, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, स्वत: लोढांनी निमंत्रण आले आहे. पण, मी मनसैनिक म्हणूनच काम करणार असल्याचा खुलासा केला. मोदींच्या प्रभावामुळेच गैरकाँग्रेसी सरकार बहुमतात आले आहे. राज्यात २४५ मतदारसंघात महायुतीला आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रभावित झाले आहेत. त्यामुळे साहजिकच १९९५ प्रमाणे भाजपामध्ये येण्यासाठी रांगा लागतील. यावर प्रदेश भाजपच्या बैठकीत अप्रत्यक्षरित्या चर्चाही झाली आहे. मात्र, शिवशाही सरकारमधील अनुभव चांगला नाही. ‘दूध पोळल्याने ताकही फुंकून पिण्याचा’ निर्णय भाजपाने घेतला आहे. प्रवेशाबाबत राजकीय विश्लेषण केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. -आ. राम शिंदे, महामंत्री, भाजपा.
भाजपाच्या वाटेवर नेत्यांची गर्दी!
By admin | Published: May 21, 2014 11:43 PM