कर्जत : राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील युवक व नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. मात्र यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी सर्वांना शक्य नाही. त्यामुळे युवक व नागरिकांच्या सोयीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्जत येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने एक मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील युवक व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या वयोगटातील नागरिकांची संख्या मोठी आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक केली आहे. यामुळे सर्वच जण ऑनलाईन नोंदणी करत आहेत. मात्र ऑनलाईन नोंदणी होत नाही. यामध्ये अनेक अडचणी येतात. संपूर्ण माहिती भरता येत नाही. नागरिकांच्या सोयीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यासमोर राशीन रस्त्यावर मदत केंद्र सुरू केले आहे. या मदत केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे व उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मनीषा वडे, शहराध्यक्ष वैभव शहा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पप्पूशेठ नेवसे, नगरसेविका हर्षदा काळदाते, उषा राऊत, राखी शहा, अश्विनी दळवी, अनिल गदादे, अमृत काळदाते, विनोद दळवी, गणेश क्षीरसागर, धांडेवाडीचे सरपंच काकासाहेब धांडे, महादेव खंदारे या ऑनलाईन मदत केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या मदत केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपचे नेते नामदेव राऊत यांनी केले आहे.
---
०९ कर्जत
कर्जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर भाजपच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लस नाव नोंदणी करण्यासाठी मदत केंद्र सुरू केले आहे.