शेवगाव : कोरोना लॉकडाउनमुळे आंदोलनाचे विविध पर्याय सध्या बंद झाले आहेत. परंतु भाजपने लॉकडाउनच्या काळातही सरकारविरोधातील अनोख्या आंदोलनाचा पर्याय शोधून काढला आहे. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी शेवगाव शहरात शुक्रवारी (दि.२२ मे) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्यात आले. तोंडाला काळे मास्क लावून भाजपच्या पदाधिका-यांनी हे निषेध आंदोलन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षित अंतर ठेवत, नियमाचे पालन करून तोंडाला काळे मास्क परिधान करून निषेध आंदोलन केले. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी शेवगाव शहरात भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक आहुजा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ ते ११.३० वाजेदरम्यान हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेवगाव शहर अध्यक्ष रवींद्र सुरवसे, सुनील रासने, अमोल घोलप, संकेत साळुंके, प्रणाव पुजारी, नवनाथ अमृत, बाबासाहेब भापकर आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
शेवगावमध्ये तोंडाला काळे मास्क लावून भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:27 PM