अहमदनगर : मराठा आरक्षणाबाबत जिल्ह्यासह राज्यात तीव्र आंदोलन पेटले असताना अनेक आमदार व खासदारांनी मात्र, याबाबत आपली भूमिका स्पष्ट न करता मौन बाळगले आहे. ‘लोकमत’ने याबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांशी संपर्क साधला असता शिवसेना व भाजपाच्या आमदारांनी विषय जाणून घेतला मात्र भूमिका स्पष्ट केली नाही.पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता दुपारी आपण नगरमध्ये येणार असून त्यावेळी सविस्तर भूमिका मांडू असे ते म्हणाले. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे आजारी असल्याने त्यांचा संपर्क झाला नाही. मात्र, त्यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे दिल्लीत असल्याने त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही. मात्र, मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांनीही आपली भूमिका एकप्रकारे स्पष्ट केलेली आहे. कॉंग्रेसचे तिसरे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचाही संपर्क झाला नाही. राष्टÑवादीचे आमदार संग्राम जगताप व राहुल जगताप यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत सरकारने तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली आहे. वैभव पिचड यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही.शिवसेनेचा जिल्ह्यात एकमेव आमदार आहे. आपला मराठा आरक्षणाला पाठिंबा असून उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास याप्रश्नावर केव्हाही राजीनामा देण्याची तयारी असल्याचे त्यांनी पारनेरमध्ये नागरिकांसमोर स्पष्ट केले आहे.भाजपचे जिल्ह्यात चार आमदार आहेत. मात्र, यातील स्रेहलता कोल्हे सोडता इतर आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यातील काही आमदार मराठा मोर्चांमध्ये सहभागी झाले होते. मात्र, गुरुवारी या आमदारांशी संपर्क साधला असता त्यांची भूमिका समजू शकले नाही. बैठकीत असल्याने नंतर भूमिका सांगू, अशी प्रतिक्रिया आमदारांनी दिली. सत्ताधारी आमदारांवर पक्षाचा दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.शंकरराव गडाख यांच्याकडून मदतमाजी आमदार शंकरराव गडाख यांनी मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. त्यांच्यावतीने कार्यकर्त्यांनी शिंदे परिवाराची भेट घेऊन ही मदत सुपूर्द केली.सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू : स्रेहलता कोल्हेआरक्षणाबाबत सत्ताधारी व विरोधी आमदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, अनेक आमदारांनी विषय जाणून घेतला. परंतु, त्यावर प्रक्रिया देणे टाळले़ सत्ताधारी भाजपाच्या वतीने केवळ आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत़ मुख्यमंत्र्यांकडे आरक्षणाची मागणी आपणही केलेली आहे, असे त्या म्हणाल्या.सत्ताधारी आमदारांची भूमिका गुलदस्त्यातभाजपाचे आ. शिवाजी कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे या सत्ताधारी आमदारांशी संपर्क साधला असता, बैठकीत असल्याने या विषयावर नंतर बोलू, असे ते म्हणाले. नंतर त्यांची भूमिका समजू शकली नाही.समाजापेक्षा कुणी मोठा नाही : राहुल जगतापमराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी सभागृहात वेळोवेळी केली़ सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही़ त्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत़ गंगापूर तालुक्यातील युवकाने जलसमाधी घेतली़ त्याच्या कुटुंबीयाची भेट घेऊन एक लाखाची मदत दिली़ समाजापेक्षा कुणी मोठा नाही़ आम्ही राजीनामे दिल्याने आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल, तर आम्ही कोणत्याही क्षणी राजीनामे देण्यास तयार आहोत, असेही राहुल जगताप म्हणाले.
आरक्षणावर भाजप आमदारांची चुप्पी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:13 PM