अकोले : पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तालुक्यातून संगमनेरला जाणारा तांदूळ भरलेला ट्रक पकडला. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलीसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदरचा तांदुळ हा रेशनचा असल्याच्या संशयाने हा तांदुळ पकडला. मात्र हा तांदुळ रेशनचा आहे की आणखी कशाचा? याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पुरवठा अधिकारी राकेश रावते यांनी दिली.
ट्रकमध्ये साडे बारा टन तांदूळ गोण्यात भरलेला होता. काळ्या बाजारातील रेशनचा हा तांदूळ घेऊन ट्रक जात असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिस निरीक्षक अरविंद जोधळे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेच पथक पाठवून कारवाई केली.
राजूर येथून संगमनेरला जाणारा रेशनिंगचा तांदूळ भरलेला ट्रक (एम.एच.१७ ए.जी.२४८३) मनोहरपर फाटा येथे पकडून अकोले पोलिस स्टेशनला आणण्यात आला आहे. यावेळी चालक शहेबाज मणियार याने सदर तांदूळ हा राजूर येथून आणला असल्याचे पोलिसांना सांगितले.
सदर घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांनी अकोले पोलिस स्टेशनला भेट देवून चौकशी केली. तसेच गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.