अहमदनगर : शहरासह उपनगरात गेल्या दहा दिवसांपासून अबालवृध्दांच्या लाडक्या गणरायाचा सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे़ गेल्या तीन ते चार दिवसांपासून गणेश मंडळांनी सादर केलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून, देखावे पाहण्यासाठी आजचा (रविवार) शेवटचा दिवस आहे़ शहरासह उपनगरात सुमारे २२५ मंडळांनी विविध देखावे सादर केले आहेत़ हे देखावे पाहण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील भाविक गेल्या तीन ते चार दिवसांपासून गर्दी करत आहेत़ शनिवारी सायंकाळी सात वाजेनंतर शहरात मोठी गर्दी झाली होती़ दिल्ली गेट, चौपाटी कारंजा, टिळक रोडसह माणिक चौक व कापड बाजार परिसरात वारंवार वाहतूककोंडी होत होती़ ही वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांना मोठी कसरत करावी लागली़ धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक देखावे भाविकांच्या पसंतीस उतरत आहेत़ माळीवाडा, टिळक रोड, दिल्ली गेट व नवी पेठ परिसरात सर्वाधिक देखावे असल्याने या परिसरात रात्री दहा ते आकरा वाजेपर्यंत भाविकांचा वावर राहतो़ माणिक चौकातील छोटा भीम, अस्तित्व हरवलेला माणूस, नवी पेठेतील शिवराज्यभिषेक, ऐतिहासिक नगर, कापड बाजारातील भगवान शंकराचे तांडवनृत्य, माळीवाडा येथील संत तुकाराम महाराजांचे वैकुंठाला गमन, तर नेता सुभाष चौकातील अंगदाकडून रावणाचे गर्वहरण हे धार्मिक व भव्य देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे़ श्रीं च्या प्रतिष्ठापनेपूर्वी सक्रिय झालेल्या पावसाने उसंत घेतल्याने भाविकांना देखावे पाहण्याचा आनंद घेता येत आहे़ (प्रतिनिधी)
झगमगाट, उत्साह अन् गर्दी
By admin | Published: September 07, 2014 12:02 AM