अहमदनगर : आमदार चंद्रशेखर घुले यांचे स्वीय सहाय्यक, समर्थक यांचा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात ‘धुडगूस’ सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जिल्हा परिषद उपाध्यक्षा मोनिका राजळे यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजळे कुटुंबीयांना अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे, अशी तक्रार राजीव राजळे यांच्या समर्थक महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडे केल्याने पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील घुले-राजळे वाद भडकण्याची चिन्हे आहेत. आमदार घुले यांच्यावर हा अप्रत्यक्ष राजकीय हल्ला असून याद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा परिषद उपाध्यक्षा मोनिका राजळे यांच्यासाठी मतदारसंघातील चाचपणीच्या वृत्ताला बळकटी मिळत आहे. घुले-राजळे गटातील पारंपरिक वाद सवश्रुत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभाला आमदार घुले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. दोघांत सन्मानजनक ‘तह’ झाल्याचीही चर्चा होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत अंतर्गत वाद संपलाच नसल्याची चर्चा सुरु झाली होती. सरलेल्या आठवड्यात घुले समर्थकांच्या मेळाव्यात थेट राजळेंवर राजकीय हल्ले करण्यात आले होते. सध्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद उपाध्यक्षपद भूषविणाऱ्या मोनिका राजळे पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारीसाठी चाचपणी करत असल्याच्या चर्चेने घुले गट अस्वस्थ आहे. राजळे यांच्यावरील टीकेने या शक्यतेला बळ मिळाले. या आरोपांना राजीव राजळे कसे उत्तर देणार, याची उत्सुकता होती. राजळेंनी समर्थकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुलेंवर निशाणा साधला आहे. राजळे यांच्या समर्थक असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रार अर्जात आ. घुले यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब आरगडे यांच्या विरोधात गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दाखल पाथर्डी पोलीस ठाण्यातील गुन्हा खोटा आहे. यात जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजळे यांना गोवण्यात आलेले असून त्या घटनास्थळी उपस्थितही नव्हत्या. हा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आ. घुले यांचे स्वीय सहाय्यक आरगडे हे पोलिसांवर दबाव आणत होते, असे म्हटले आहे. राजळे या जिल्हा परिषदेत अडीच वर्षापासून काम करत आहेत. यात विशेष करून महिलांचे उत्तमपणे संघटन करत असतांना एका कर्तृत्ववान महिला पदाधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्याचे काम आ. घुले यांच्याकडून झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या लोकप्रतिनिधीकडून महिला बचत गटातील महिलांची पिळवणूक होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या पाथर्डी येथील मेळाव्यात पक्षाने राजळे कुटुंबीयांना खूप दिले असल्याची भाषा जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी केली होती. मात्र, जिल्हाध्यक्ष अभंग यांना मोनिका राजळे व राजळे कुटुंबीयांना निवडणूकपूर्व, निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर झालेल्या मानसिक व अपमानास्पद वागणुकीची माहिती नसावी, असा उपरोधिक टोला लगावण्यात आला आहे. हे आरोप आ.घुले यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने असले तरी अप्रत्यक्षपणे घुले यांनाच लक्ष्य करण्यात आले आहे. तक्रार अर्जावर दीपाली बंग, मंगल कोकाटे, (पाथर्डी नगरपालिकेच्या नगरसेविका), उषा अकोलकर (सभापती पंचायत समिती), राजकमल तुपे (सरपंच, कासारपिंपळगाव), काशिबाई गोल्हार (पंचायत समिती सदस्य), मंगल अंदुरे (सरपंच, खरवंडी कासार), सिंधूबाई जायभाय ( संचालिका, वृध्देश्वर साखर कारखाना) यांच्या सह्या आहेत. या वादाने राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे असून घुले या हल्ल्याला कसे उत्तर देणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष असेल. ४आ. घुले यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब आरगडे यांच्याशी संपर्क साधून तक्रारीबाबत विचारणा केली असता, मला काही सांगता येणार नाही, असे सांगत त्यांनी मोबाईल बंद केला. त्यानंतर अनेक वेळा संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
घुले-राजळे वाद भडकण्याची चिन्हे
By admin | Published: September 02, 2014 1:16 AM