अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद्ग्रस्त ठरलेला श्रीपाद छिंदम मंगळवारी छत्रपतींसमोर नतमस्तक झाला. महापलिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराजांसह डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले़
महापालिका निवडणुकीत छिंदम याने प्रभाग क्रमांक 9 मधून अपक्ष उमेदवारी करीत विजय मिळविला़ निवडणूक काळात प्रशासनाने छिंदमला शहरातून हद्दपार केले होते. सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी छिंदमने त्यांच्या दिल्लीगेट येथील कार्यालयात येऊन प्रथम महापुरूषांना अभिवादन केले़ यावेळी बोलताना छिंदम म्हणाला, निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होता आले नाही. मात्र, जनतेने मला निवडून दिले. हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. जिल्हा बंदीची मुदत संपल्यानंतर नगर शहरात आलो. या ठिकाणी मात्र कुणाचाही सत्कार न घेता प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरूषांना अभिवादन करून नतमतस्क झालो. या महापुरुषांच्या आशीर्वादानेच मला हा विजय मिळाला. आता, प्रभागातील मतदार बंधू-भगिनींच्या भेटी घेऊन त्यांचे आभार मानणार आहे. यावेळी विनायक गुडेवार, अशोक देशपांडे, नितीन शेलार, राजू म्याना, समीर शेळके, अशोक पारधे, भैया साळवे, किशोर साळवे, संदीप वाघमारे, शरद जाधव, येशूदास बारस्कर, प्रतीक सोनवणे, अतुल सोनवणे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचा महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे. पहिल्या काही फेऱ्यांत पिछाडीवर असलेल्या छिंदमने नंतर आघाडी घेतली, ती आघाडी शेवटपर्यंत राखत त्याने विजय मिळविला. त्यानंतर प्रथमच तो नगरमध्ये दाखल झाला. श्रीपाद शंकर छिंदम प्रभाग 9 (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष निवडणूक लढवत होता. या प्रभागात छिंदमविरोधात अनिता राजेंद्र राठोड (राष्ट्रवादी), सुरेश रतनप्रसाद तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.