अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकेबंदी उभारण्यात आले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासूननगर जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच चेकपोस्टही उभारण्यात आले आहेत. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
रविवारी शेवगाव-गेवराईच्या सरहद्दीवर महारटाकळी येथे चेक नाका सुरू करण्यात आला आहे. महारटाकळी येथील शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदीसाठी राहुटी लावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी आपल्या पथकासह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच येथील परिसराचा त्यांनी आढावा घेतला. महारटाकळी येथे नगर व बीड जिल्ह्याची सरहद्द असल्याने यामार्गे अवैध दारू, अवैध पैसे, इत्यादी जाण्याची दाट शक्यता असल्याने ही नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनांची रात्रंदिवस तपासणी चालू करण्यात आली आहे. नाकेबंदी लोकसभा निवडणूक संपेपर्यंत चालणार आहे. या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच वायरलेस संदेश यंत्रणा ही बसवण्यात आलेली आहे. शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर नगर व बीड या दोन्ही जिल्ह्याच्या सरहद्दिवर महारटाकळी येथे चेक नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करताना पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब शिरसाठ,पोलीस कॉन्स्टेबल महेश रुईकर,पोलीस कॉन्स्टेबल विजय तिडके,पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण करीत आहेत.