कर्जत : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.१) पुणे दौऱ्यावर असताना कर्जत-जामखेड एमआयडीसीची मंजुरी रखडल्याबाबतचे फलक कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवांनी झळकाविले. या फलकांने अनेकांचे लक्ष वेधले होते.
कर्जत-जामखेड मतदारसंघात खंडाळा-पाटेवाडी येथील एमआयडीसीचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. याबाबत आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात राजकीय श्रेयवादात पावसाळी अधिवेशनात रंगल्याचेही दिसले. यातच मंगळवारी पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमासाठी पुणे दौऱ्यावर आले असता कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य युवकांनी मोदी यांच्या दौऱ्यात "आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे.
महाराष्ट्र शासन कर्जत-जामखेड येथील एमआयडीसी संदर्भात वेळकाढूपणा करत आहे. आपण देशाचे मोठे नेते आहात, युवकांचा विचार करून एमआयडीसी संदर्भात तातडीने योग्य निर्देश देऊन मान्यता द्यावी ही विनंती." या आशयाचे फलक झळकवत थेट कर्जत-जामखेड एमआयडीसीबाबत लक्ष घालण्याची विनंती केली. एकीकडे राज्य सरकार कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीला अधिसूचना काढून मंजुरी देत नसतानाच दुसरीकडे आता थेट पंतप्रधान मोदींनाच मंजुरी बाबतची विनंतीची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.