अकाेले (जि. अहमदनगर) : प्रवरा नदीत बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) जवानांची बोट प्रवरा नदीत उलटल्याने सहा जण बुडाले. ही घटना गुरुवारी सकाळी सुगाव बुद्रुक (ता. अकोले) येथे घडली. बुडालेल्या सहा जणांमध्ये पाच जवान आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश आहे. तीन जवानांचे मृतदेह सापडले असून दोन जवानांना वाचविण्यात यश आले आहे. एक स्थानिक नागरिक अद्याप बेपत्ता आहे.
सुगाव बुद्रुक येथे बुधवारी दोन युवक बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह बाहेर काढला होता, तर दुसरा बेपत्ता होता. त्यासाठी धुळे येथून ‘एसडीआरएफ’चे गुरुवारी पहाटे दाखल झाले. शोधकार्य सुरू असतानाच नदीतील मोठा भोवरा व खड्डा असलेल्या ठिकाणी हेलकावे खात बोट उलटली. सहा जण बुडाल्याचे दिसताच दुसऱ्या टीमने बचावकार्य सुरू केले. मात्र, त्यापैकी दोघांनाच वाचवण्यात यश आले.
बंधाऱ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यूसिन्नर (नाशिक) : तालुक्यातील कुंदेवाडी येथे बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन १६ वर्षीय शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. सार्थक काळू जाधव (१६) व अमित संजय जाधव (१५) असे मृतांची नावे आहेत.
नागपुरात तरुण बुडालाहिंगणा : मोहगाव परिसरात फिरायला आलेल्या सहा मित्रांपैकी एका कॉलेज विद्यार्थ्याचा गुुरुवारी तलावात बुडून मृत्यू झाला. विनीत राजेश मनघटे असे मृताचे नाव आहे.
तीन ते चार दिवसांत राज्यात १९ जणांचा मृत्यू- उजनी धरणाच्या जलाशयामध्ये मंगळवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांना जलसमाधी मिळाली. त्यांचे मृतदेह गुरुवारी नदीपात्रात इनामदार वाड्याजवळच तरंगताना आढळले.
- नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. तर इगतपुरी तालुक्यातच विहिरीत पडून मायलेकीचा मृत्यू झाला. पुण्यात आजोबांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावंडाचा बुडून मृत्यू झाला तर बीडमध्ये दोन मुलांसह महिलेचा बुडून मृत्यू झाला.