लोकमत न्यूज नेटवर्क
बोधेगाव : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करण्यात येत आहे. या परिसरात पारंपरिक पिकांना फाटा देऊन पहिल्यांदाच केळीचा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा माल युरोपीय देशात निर्यात होत आहे. यामुळे कोरडवाहू भागातील बोधेगाव परिसरात केळीचे नंदनवन फुलताना दिसून येत आहे.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव तसेच चापडगाव परिसरातील लागवडीखालील बहुतांश क्षेत्र जिरायती आहे. दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करावा लागत असल्याने या भागातील शेतकरी सालाबादप्रमाणे कपाशी, तूर, बाजरी, ज्वारी, गहू आदी पिकांना प्राधान्य देत असतात; परंतु पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळूहळू शेतकऱ्यांचा फळबागांकडे कल वाढलेला दिसतो. बोधेगाव कृषी मंडळात जवळपास १५ हेक्टर आंबा, ४५ हेक्टर सीताफळ, ५६.८० हेक्टर मोसंबी, १४.५० हेक्टर पेरू आदी फलोत्पादनाचे क्षेत्र प्रस्तावित आहे.
मागील वर्षात येथील कृषी मंडळातील बोधेगाव, हातगाव, कांबी, मुंगी, पिंगेवाडी, गोळेगाव आदींसह चापडगाव मंडळातील गदेवाडी, खामपिंप्री, दहिगाव शे., खडके-मडके आदी गावांत जवळपास १९२ हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड करण्यात आली आहे.
एका वर्षामध्ये कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे नगदी पीक असल्याने केळी लागवड शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. नुकतेच येथील संजय बाबासाहेब काशिद या शेतकऱ्याच्या १ हजार केळी खोडांच्या केळीची युरोपीय देशात निर्यातीसाठी निवड झाली आहे. या फळबागेस तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, मंडळ कृषी अधिकारी श्रृतिका नलवडे, कृषी सहायक गणेश पवार आदींनी भेट देऊन पाहणी व मार्गदर्शन केले. यावेळी दिनकर काशिद, बाबासाहेब तांबे, नारायण काशिद, लक्ष्मण काळे, अशोक काशिद आदी शेतकरी उपस्थित होते.
-----
मी जवळपास १ हजार केळी रोपांची लागवड केलेली आहे. पाण्याची उपलब्धता व उसापेक्षा फायदेशीर असल्याने ही लागवड केली आहे. निर्यातीमुळे येथील बाजारपेठेत मंदी असूनही युरोपीय देशात केळीसाठी चांगला भाव मिळाला आहे.
-संजय काशिद,
प्रगतशील शेतकरी, बोधेगाव.
------
शेवगाव तालुक्यातील जवळपास ५०० हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. योग्य मार्केटिंग व निर्यातीमधून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न देणारे हे पीक आहे. कृषी विभागाकडून पुढील हंगामात यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करणार आहोत.
-किरण मोरे,
तालुका कृषी अधिकारी, शेवगाव.
फोटो ओळी ३१ बोधेगाव केळी
बोधेगाव येथील प्रगतशील शेतकरी संजय काशिद यांच्या युरोपीय देशात निर्यातीसाठी निवड झालेल्या केळी प्लाॅटची पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, मंडळ कृषी अधिकारी श्रृतिका नलवडे व उपस्थित शेतकरी.