बोधेगाव (ता.शेवगाव) येथील सोमनाथ बन्सी गायकवाड (वय ४३) हे टोपले, झाप, कणग्या विणण्याच्या पारंपरिक व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवस ते एका खासगी साइटवर वाॅचमन म्हणूनही कामाला होते. मात्र, तीन-चार महिन्यांपूर्वी तोंडाचा त्रास जाणवू लागल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, तोंडाचा कॅन्सर असल्याचे उपचारादरम्यान निदान झाले. त्यावेळी औरंगाबाद येथील कॅन्सर रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, परंतु शस्त्रक्रिया होऊन जवळपास साडेतीन महिने उलटले, तरी तोंडाची जखम भरून येत नसल्याने सध्या सोमनाथ गायकवाड हे जगण्याची उमेद हरवून बसले आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शस्त्रक्रियेसाठी आर्थिक जोर लावला, परंतु नियमित केमोथेरपी, औषधोपचार आदी पुढील उपचारासाठी कुटुंबीयांची आर्थिक विवंचना पाहून येथील अप्पासाहेब गायकवाड, राजेंद्र कैकाडी, कारभारी गायकवाड, दीपक गायकवाड, अर्जुन गायकवाड, राजेंद्र जाधव, दिलीप गायकवाड, जयराम कैकाडी, सुरेश जाधव आदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मदतीसाठी आवाहन केले. त्यास प्रतिसाद देऊन बोधेगावकर ग्रामस्थांसह परिसरातील अनेकांनी शक्य ती आर्थिक मदत देऊ केली आहे. दोन दिवसांत साधारणतः ३० ते ४० हजारांची मदत जमा झाली आहे.
फोटो ०४ सोमनाथ गायकवाड
फोटो ओळी---
बोधेगाव येथील दुर्धर आजाराने मृत्यूशी झुंज देत असलेले युवक सोमनाथ बन्सी गायकवाड.