अपहत गौतम हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह रेल्वेमार्गाच्या कडेला आढळला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 11:59 AM
श्रीरामपूर : गेल्या सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह येथील एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून आला.
श्रीरामपूर : गेल्या सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह येथील एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून आला.हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांचा यापूर्वीच घातपात केला असण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या अधिवेशनात हिरण यांच्या अपहरणाचा मुद्दा चर्चिला गेला होता. मात्र पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात अपयश आले. शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी बेलापूर येथे येऊन अपहरण प्रकरणाची माहिती घेतली होती. त्यांच्या शोधासाठी चार पथके रवाना करण्यात आली होती. मात्र उपयोग झाला नाही. पोलिसांना हिरण यांच्या अपहरणा मागील हेतू शेवटपर्यंत समजला नाही. त्यामुळे तपासाची निश्चित अशी दिशा घेता आली नाही. प्रारंभी काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका व्हॅनचा तपास केला. मात्र त्यात तथ्य आढळून आले नाही. या दरम्यान पोलिसांचा वेळही वाया गेला होता.हिरण यांच्या अपहरणानंतर बेलापूर येथे शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. घटनेची गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही अधिवेशनात याप्रकरणी गृहमंत्र्यांना प्रश्न उपस्थित केला होता. श्रीरामपूरचे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र देत हिरण यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी केली होती.