पाथर्डी : पोलीस पथकाने आल्हनवाडी येथील बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर औषध साठा जप्त करून डॉक्टरला ताब्यात घेतले. मात्र काही ग्रामस्थांनी डॉक्टरला पोलीस ठाण्यात नेण्यास मज्जाव केला. हा प्रकार चालू असताना गर्दीचा फायदा घेऊन हा डॉक्टर पसार होण्यात यशस्वी झाला. आज (दि. १५) सकाळी अकराच्या सुमारास आल्हनवाडी येथे ही घटना घडली.
ओम संतोष ठाकूर हे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. आल्हनवाडी येथील या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर यापूर्वी दोन वेळा छापा टाकण्यात आला. परंतु ग्रामस्थ व काही पुढाऱ्यांनी विरोध केल्याने डॉ. ठाकूर त्या वेळी पळून गेला होता. ठाकूर याच्याविरुद्ध बोगस वैद्यकीय व्यवसायप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. परंतु काही कालावधीनंतर ठाकूर याने आल्हनवाडी येथे आपला व्यवसाय पुन्हा थाटला होता. आल्हनवाडी येथे रविवारी आठवडे बाजारच्या दिवशी ठाकूर रुग्णावर उपचार करीत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त खबºयामार्फत मिळाली. पाथर्डी तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, ज्ञानेश्वर गोसावी, आरोग्य सेवक संदीप जाधव, बाळासाहेब राठोड यांनी दवाखान्यावर छापा टाकून डॉ. ठाकूर यास ताब्यात घेतले. परंतु आल्हनवाडी गावातील जमावाने पथकाच्या गाडीसमोर आडवे झोपून ठाकूर यास पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास विरोध केला व पथकाच्या गाडीतून ठाकूर यास जबरदस्तीने उतरवून घेतले. त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन ठाकूर घटनास्थळावरून पसार झाला.पथकाने दवाखान्यातून मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन, सुया, औषधांचा मोठा साठा जप्त केला. पाथर्डी पोलीस ठाण्यात डॉ. ठाकूर विरुद्ध फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते. अहमदनगर शहरातही ठाकूर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. आल्हनवाडी येथे ओम ठाकूर कोणाच्या घरात अवैध वैद्यकीय व्यवसाय करीत होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.औषध पुरविणारांचा शोध घेणारवैद्यकीय व्यवसायाचा परवाना असल्याशिवाय औषधे पुरविण्यात येऊ नये, असा नियम असतानाही या बोगस डॉक्टरला कोणी औषधे पुरवली, याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करण्याबाबत पाथर्डी तालुका आरोग्याधिकाºयांनी औषधे निरीक्षकांना कळविले आहे.