विनोद गोळेपारनेर : प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पारनेर तालुक्यात लोकवर्गणीतून पुस्तके घेऊन पुस्तक बँक बनविण्याचा अभिनव उपक्रम पारनेरचे तहसीलदार व साहित्यिक गणेश मरकड यांच्या संकल्पनेतून राबविला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मालकीचे पुस्तक राहणार आहे. या पुस्तक बँकेचा गुरूवारी राळेगणसिध्दीतून प्रारंभ होणार आहे़सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये वाचनालये असली तरी, त्यांची मालकी शाळांची असते़ त्यामुळे विद्यार्थी वाचनालयातील पुस्तके घेण्यात धजावत नाहीत, असे साहित्यिक असलेले पारनेरचे तहसीलदार मरकड यांच्या लक्षात आले. त्यांनी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्याबरोबर चर्चा करून पारनेर तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पुस्तक बँक सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात तीनशे पुस्तके राळेगणसिध्दीतील प्राथमिक शाळेला भेट देण्यात येणार आहेत़ प्रत्येक शाळेला आपण ही योजना सांगणार असून यास चांगला प्रतिसाद मिळेल, असे गटशिक्षणाधिकारी बुगे यांनी सांगितले.अशी तयार होणार पुस्तक बँकगावामध्ये किंवा शाळा, महाविद्यालयांमध्ये कुणाचा वाढदिवस असल्यास वाढदिवसाची भेट म्हणून पुस्तके स्वीकारण्यात येतील़ही पुस्तके थेट विद्यार्थ्यांना भेट दिली जाणार आहेत. ती पुस्तके ज्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी पाहिजे, त्यांनी शिक्षकांमार्फत या पुस्तकांची वाचायला देवाण-घेवाण करायची. ही पुस्तक बँक विद्यार्थ्यांमध्येच राहणार आहे.
शाळांमध्ये असा उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होणार आहेच, शिवाय लोकवर्गणीतून मोठ्या प्रमाणावर पुस्तके जमा होऊन त्याची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल. - गणेश मरकड, साहित्यिक व तहसीलदार, पारनेर.पुस्तक बँकेचा उपक्रम स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांना महापुरूषांची व शास्त्रज्ञांसह प्रेरणादायी छोटी पुस्तके वाचनास दिल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे़ -अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.
पारनेर पंचायत समितीच्या वतीने या पुस्तक बँकेच्या उपक्रमाला चालना देण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. लोकवर्गणीतून व लोकसहभागातून हा उपक्रम राज्याला प्रेरणादायी ठरणार आहे़ - राहुल झावरे, सभापती, पंचायत समिती, पारनेर.