अण्णा नवथर
अहमदनगर : कोरोनाच्या महामारीमुळे अनेक मोठे व्यवसाय बंद पडलेले आहेत. बळीराजा मात्र कंबर कसून कामाला लागला असून, शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांना ७७१ कोटींचे कर्ज वाटप झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हे कर्ज एकप्रकारे बूस्टर डोस ठरला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वच क्षेत्रांची वाताहत झाली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यवसाय पूर्ववत होत असतानाच पुन्हा दुसरी लाट येऊन धडकली. ग्रामीण भागात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून येत आहेत. असे असले तरी बळीराजाने हिंमत न हारता खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यात यंदा मान्सून वेळेवर बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. सरकारच्या कर्जमाफीमुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले असून, त्यांच्याकडून नव्याने कर्जांची मागणी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून ७७१ कोटींचे कर्ज घेतले असून, या कर्जातून खरीपाचे पीक उभे करण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीची नांगरणी कोळपणी सध्या सुरू असून, यंदा कोणते पीक घ्यायचे याची चर्चा सध्या ग्रामीण भागात सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कृषी सेवा केंद्रासह खताची दुकानेही बंद आहेत. मशागतीसाठी इंधन मिळत नाही. कोरोनाच्या भीतीने मजूरही कामावर येत नाही, अशा कठीण परिस्थितीतही बँकांकडून कर्ज घेऊन बळीराजा मशागतीच्या कामाला लागला आहे. कोरोनामुळे कुणाच्याच संपर्कात जायला नको, आपल्या शेतात काम केलेले बरं, असे म्हणत शेतकरी रात्रंदिवस शेतात राबताना दिसत आहेत.
.....
बँकांकडून कर्जासाठी ऑनलाईन सुविधा
कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत आहे. वाड्या-वस्त्यांवर कोरोना पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी बँक गर्दी करू नये. बँकेतून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्हा अग्रणी बँकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज हवे आहे, अशा शेतकऱ्यांनी अहमदनगर एनआयसी डॉट कॉम, या पोर्टलवरील अर्ज भरून मागणी नोंदवावी. ही नोंदणी केल्यानंतर बँकेतून फोन येईल. त्यानंतर कर्जाबाबतची कार्यवाही केली जाणार असून, शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संदीप वालवलकर यांनी सांगितले.
....