अहमदनगर : शिवसेना महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. यापूर्वीच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार झाला असेच यावरून सिद्ध झाले आहे. त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला याची एकप्रकारे त्यांनी कबुलीच दिली आहे, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी बुधवारी महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त अभियान राबविण्याची घोषणा केली. त्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला वाकळे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, पैसे घेऊन नगररचना विभागातील अभियंत्यांच्या बदल्या केल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला. आरोप करण्याचीही त्यांची लायकी नाही. वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी आरोप केला आहे. वाकळे हे चांगले काम करीत आहेत, असे उपनेते राठोड यांनी बुधवारी रात्री कल्याण रोडवर झालेल्या एका जाहीर कार्यक्रमातून सांगितले आहे. त्यावेळी बोराटेही तेथे उपस्थित होते. दोनवेळा शिवसेनेची महापालिकेत सत्ता होती. त्यामुळे पैसे घेऊन बदल्या करण्याचा बोराटे यांचा अनुभव असू शकतो. बोराटे काय आहेत, हे सर्व नगरला माहिती आहे. सभागृह नेता असतानाही माझ्यावर काही आरोप झाले होते. काम करीत राहणे हा स्वभाव आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांची पाठराखण कदापिही करणार नाही, असे वाकळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान वाकळे यांनी केलेल्या टीकेला शुक्रवारी उत्तर देणार असल्याचे बोराटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बोराटेंची बोलायची लायकीच नाही : महापौर बाबासाहेब वाकळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:38 AM