श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका व इतर सर्व निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठक घेऊन घेतला आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकिय आखाड्यात भाजपा व दोन्ही काँग्रेसची आघाडी यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे उपस्थित होते.आ़ जगताप म्हणाले, आता भाजपाच्या विरोधात लाट उसळली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसला आगामी सर्व निवडणुकांमध्ये जनाधार मिळणार आहे. श्रीगोंद्यात राजेंद्र नागवडे हे धोनी तर अण्णासाहेब शेलार हे विराट कोहलीप्रमाणे फलदांजी करीत आहेत. त्यामुळे चिंता राहिलेली नाही. पालिकेसाठी काँग्रेसची सत्ता असताना विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. मात्र श्रेय भाजपाने लाटले आहे, असा टोला लगावला.नागवडे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून श्रीगोंद्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी आहे. ही आघाडी ठेवत भाजपाला धोबीपछाड करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे.अण्णासाहेब शेलार म्हणाले, आता वातावरण बदलले आहे. भाजपाच्या विरोधात नाराजी निर्माण झाली आहे. नगरपालिका निवडणुकीत कोण नगराध्यक्ष, कोण नगरसेवक होईल याला महत्व नसून ते आघाडीचे झाले पाहिजेत हे अधिक महत्वाचे आहे.यावेळी एकनाथ आळेकर, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, राजू गोरे, जालिंदर घोडके, सादिक जमादार, फक्कड मोटे, असीफ इनामदार, शिवाजी शेळके, अशोक आळेकर आदी उपस्थित होते. आभार दादा औटी यांनी मानले.
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक एकत्रित लढविण्याचा दोन्ही काँग्रेसचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:29 PM