लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे बिगुल वाजणार, याचे संकेत मिळताच सत्ताधारी व विरोधी गटातील सेनापतींनी आपल्या सुभेदारांना अलर्ट होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण कोणाबरोबर जाणार? विद्यमान संचालकांपैकी उमेदवारी कोणाला मिळणार? यावर खलबते सुुरू झाली आहेत.
कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव नागवडे (बापू) यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडीत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांना कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आव्हान दिले आहे.
राजेंद्र नागवडे यांचा कारखान्याबाबतीत बापूंमुळे सध्यातरी पाया पक्का दिसत आहे. मात्र, एकेकाळचे बापूंचे निकटवर्तीय असलेले केशव मगर यांनी अण्णासाहेब शेलार, जिजाबापू शिंदे, दीपक भोसले यांना बरोबर घेऊन विरोधासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण येऊ लागले आहे. विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी आमदार बबनराव पाचपुते यांना मदत केली. त्यामुळे बबनराव पाचपुते यांनी अद्याप कोणतीच भूमिका घेतलेली नाही. मात्र, पाचपुतेंचे काही कार्यकर्ते नागवडेंच्या पॅनलमध्ये उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. याचवेळी काही कार्यकर्ते विरोधी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
२०१९मधील विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी घनश्याम शेलार हे ऐनवेळी नागवडेविरोधी भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. माजी आमदार राहुल जगताप हे या निवडणुकीत सक्रिय होणार नसल्याचे समजते. मात्र, ते काय कानमंत्र देतात, याबाबत उत्सुकता आहे. राजेंद्र नागवडे यांचे बंधू दीपक नागवडे भावासाठी स्वत: मैदानात उतरणार का? याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
कारखाना निवडणुकीत संचालक पदासाठी २३ जागा आहेत. यामध्ये सहा गटांमधील तीन गटांमध्ये प्रत्येकी तीन तर अन्य तीन गटांमध्ये प्रत्येकी दोन जागा राहणार आहेत. गटनिहाय जागा वाटप झाल्यानंतरच उमेदवारीचे भविष्यात ठरणार आहे.
-----
भोस, नाहाटांची नागवडेंना साथ?
नागवडे कारखाना निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, बाळासाहेब नाहाटा यांनी नागवडे गटाला साथ देण्याचे संकेत दिले.