आॅनलाइन लोकमतभेंडा (अहमदनगर), दि़ ४ - नेवासा तालुक्यातील शहापूर येथील दोघीचा मुळा उजवा कालव्यात बुडून मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली.देवगाव-देडगाव रस्त्यावर कोळगेवस्ती येथे मुळा उजवा कालव्यावर सकाळी अनिता संदीप कोळगे (वय १९, रा. शहापूर) ही तरुणी धुणे धुत असताना पाय घसरुन कालव्यात पडली़ पाण्याला वेग असल्यामुळे ती पाण्यात वाहून जात असतानाच तिची भाची मयुरी पंढरीनाथ चव्हाण (रा. गंगापूर, वय १५) हिने मामीला वाचविण्यासाठी हात दिला. परंतु मयुरीचाही तोल जाऊन तीही पाण्यात पडली़ त्यामुळे दोघींचा पाण्यात बुडून करुण अंत झाला़शहापूर व देवगाव येथील १०० ते १२० तरुणांच्या गटाने कालव्यात शोधकार्य सुरू केले. जाळे टाकून, पाण्यात उतरुन दोघींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींचा शोध लागू शकला नाही़ या घटनेने शहापूर, देवगाव परिसरात शोककळा पसरली आहे.