अहमदनगर : खून, विनयभंग आणि खंडणीच्या गुन्ह्यात तब्बल १५ दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर बाळ बोठे याची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. बोठे याने मात्र पारनेर न्यायालयात अर्ज करत ‘मला नगर व पुणे जिल्ह्यांच्या बाहेर ठेवा’ अशी मागणी केली आहे. या अर्जावर १ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी बोठे याला १३ मार्च रोजी हैदराबाद येथून अटक केली. न्यायालयाने प्रथम त्याला सात, नंतर तीन व दोन अशी बारा दिवसांची पोलीस कोठडी दिली. २५ मार्च रोजी बोठे याची पोलीस कोठडी संपताच विनयभंगाच्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी त्याला वर्ग करून घेतले. येथे त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी वर्ग करून घेतल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. खून, विनयभंग आणि खंडणी अशा तीन गुन्ह्यांत बोठे हा सलग पंधरा दिवस पोलीस कोठडीत होता. दरम्यान, बोठे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी त्याला पारनेर येथे हजर केले. सध्या बोठे याला पारनेर जेलमध्ये ठेवले जाणार आहे. दरम्यान, बोठे याने केलेल्या अर्जावर १ एप्रिल रोजी पारनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे.
...........
पोलिसांकडून पुरवणी
दोषारोपपत्राची तयारी
रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी बाळ बोठे याच्यासह इतर पाच आरोपींविरोधात आधी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता बोठे याच्याविरोधात पोलीस स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणार आहेत. बोठे याला अटक केल्यानंतर चौकशीत अनेक बाबी उघड झाल्या असून, महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले आहेत. या पुराव्यांचा समावेश असलेले दोषारोपपत्र पोलीस तयार करत आहेत.