जामखेड : नगर परिषद कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकले असून ते मिळावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलसमोर दंडवत व भीक मागो आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी आश्वासन दिल्यानंतर गुरुवारी रात्री उपोषण मागे घेण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी नगर परिषदेचे कर्मचारी व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात शहरात दंडवत घालून, भीक मांगो आंदोलन करून साडेअकराच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर आले. तेथेही आंदोलन करण्यात आले.
जाधव म्हणाले, नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्यातील थकीत पगारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १० नोव्हेंबर रोजी असेच ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात आले होते. तेव्हा या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पगार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा आंदोलन केले असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, पंचायत समिती सभापतीच्या राजश्री मोरे, ॲड. हर्षल डोके, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, अनिल पवार, किशोर गायवळ, ॲड. महेश काटे, तात्याराम पोकळे, फकीर शेख, पांडुरंग भोसले, माजी उपसरपंच सुरेश नाना जाधव, आजिनाथ शिंदे, विशाल पवार, प्रहार संघटनेचे जयसिंग उगले, नय्यूम शेख, माजी उपसरपंच हनुमंत पाटील आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
फोटो : ०४ जामखेड आंदोलन
जामखेड तहसीलसमोर नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आंदोलन करण्यात आले.