श्रीरामपूर : यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. संमेलनात कविता सादर करण्याची संधी मिळालेल्या पहिल्या तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा आरोप करीत बहिष्काराची घोषणा केली आहे.ज्येष्ठ साहित्यिकांवर अशी वेळ ओढवणार असेल तर आपणही संमेलनात उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संमेलन ११ ते १३ जानेवारी या कालावधीत होत आहे. उद्घाटनाच्या भाषणाद्वारे मांडल्या जाणाºया संभाव्य भूमिकेवरूनच सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत कवयित्री दिशा शेख यांना संपर्क केला असता, घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी खेद व मोठी चिंता व्यक्त केली.शेख म्हणाल्या, सहगल यांचे भाषण माझ्या वाचनात आले. त्यात संमेलनाचे निमंत्रण नाकारण्यासारखे काहीही नाही. वादग्रस्त असा कुठलाही विचार त्या मांडणार नव्हत्या. सहगल यांची गांधी विचारांशी नाळ जोडलेली आहे.आपल्या आई-वडिलांची स्वातंत्र्य लढ्यातील भूमिका आणि त्यातून त्यांची झालेली जडण-घडण असाच काहिसा त्या भाषणाचा संदर्भ होता. धर्म-जातीच्या नावावर सध्या सुरू असलेल्या राजकारणावरही त्या भाष्य करणारहोत्या.निमंत्रण नाकारण्याचा प्रकार गंभीरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संमेलनास उपस्थित राहणार होते. अशा वेळी सहगल या गांधी-नेहरू यांच्या विचारांचे कौतुक करतील अशी शक्यता होती. विषय काहीही असो, मात्र एखाद्या साहित्यिकास उद्घाटक म्हणून निमंत्रित केल्यानंतर व त्याचे भाषण मागवल्यानंतर निमंत्रण नाकारण्याचा प्रकार गंभीर असल्याचे शेख यांनी सांगितले.एखाद्यास बोलण्यापासून थांबविणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. उद्या कदाचित माझ्या एखाद्या लिखाणावर कुणी असहमत असेल तर त्याचा अर्थ वागण्याची ही पद्धती नव्हे असे शेख यावेळी म्हणाल्या.
नगरच्या कवयित्रीचा साहित्य संमेलनावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 7:18 PM