सिध्दटेक : पुणे जिल्ह्यातील भामा -आसखेड धरणातून सोडलेले पाणी न पोहचल्याने जलालपूर (ता. कर्जत) येथील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रांताधिकारी,तहसीलदारांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदने पाठविली आहेत.अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेला वरदान ठरलेले भीमा नदीवरील उजनी जलाशय यावर्षी १०९ टक्के भरले होते. मात्र पाणी वाटपाच्या नियोजनाअभावी जलालपूर येथील नदी पात्र कोरडे पडून पिके करपू लागली आहेत.सिद्धटेक, बेर्डी, दुधोडी येथील पाणी पाच सहा दिवस तर भांबोरा, गणेशवाडी, खेड येथील पाणी पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढेच आहे. ग्रामस्थांनी २५ आॅगस्टला पाणी सोडण्यासाठी ग्रामसभेचा ठराव देऊन पालकमंत्र्यांसह प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र त्यांनी टाळाटाळ केल्याने त्यांच्याबद्दल ग्रामस्थांमध्ये रोष आहे.उजनी जलाशयात आमच्या जमिनी गेल्या, आणि पाणी दुसरे पळवितात. पुणे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी आणण्यासाठी लोकप्रतिनिधी काहीच प्रयत्न करीत नाहीत. त्यांना भीमा पट्ट्याचे वाळवंट करायचे आहे काय? -रामदास बिबे, ग्रामस्थ, जलालपूर.याबाबत मी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून ग्रामस्थांबरोबर बैठक घेणार आहे. -राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, अहमदनगर.
पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 1:03 PM