अहमदनगर : जिल्ह्यात विकास कामे करताना सरकारने कधीच दुजाभाव केला नाही. जिल्ह्यातील विकास कामांना सुद्धा कधी निधीची कमतरता पडू दिली नाही, पण जो निधी दिला त्याचा साधा उपयोग सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांना करता आला नाही. स्वत:चे उपयश झाकण्यासाठी अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी पालकमंत्र्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कधी प्रशासनावर तर कधी विरोधकांवर आरोप करण्याचा नवा फंडाच विखे कुटूंबियांनी सुरु केला कि काय असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांनी लावला आहे.बेरड म्हणाले, विकास कामांना कधीच निधी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कमी पडू दिला नाही. याउलट विखेंची सत्ता जिल्हा परिषदेत आल्यानंतर विकास कामांनाच ब्रेक लागला. कालच्या सभेत तर जिल्हा परिषद हि ठेकेदारांसाठीची संस्था आहे. हा घणाघाती आरोप त्यांच्याच सहकारी पक्षाने करुन विखेंचे वाभाडे एक प्रकारे काढले आहे. हिच पावती विखे यांना काल सभागृहात त्यांच्या कामाची मिळाली. असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही असेच म्हणावे लागेल. प्राथमिक शाळा निंबोडी येथील दुर्घटनेनंतर जिल्हा परिषदेकडून पुनर्विनियोजनाचे लघु पाटबंधारे २५ लक्ष, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे २५ लक्ष, रस्ते २५ लक्ष असे एकूण ७५ लक्ष रुपयांची विशेष तरतुद करण्यात आली. याच बरोबर विशेष सवलतीचे ८ लक्ष व गणवेश व लेखनाचे ३१ लक्ष असे एकूण ३९.५४ लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली होती. त्यामुळे एकूणच जानेवारी महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत ४२५ लक्ष रुपयांची विशेष तरतुद बैठकी मंजुर करण्यात आली. त्याच बरोबर फेब्रुवारी महिन्यात नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत २५० लक्ष रुपयांची तरतुद करण्यात आली. त्यामुळे अंतिम तरतुद ७१४.५४ लक्ष करुन वाढीव तरतुद ३६४.५४ लाख रुपयांची करुनही निधी मिळाला नसल्याच्या वल्गना करणा-यांना ही आकडेवारी पुरेशी आहे. जानेवारी २०१८ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत विशेष निधीची तरतुद करुनही गेल्या ६ महिन्यापासून हे काम कोणामुळे थांबले याचा खुलासा करण्या ऐवजी पालकमंत्र्यांवर आरोप केले म्हणजे विषय संपतो, अशीच जणु जिल्हा परिषदेची धारणा बनत चालली आहे.या अगोदर सुद्धा जिल्हा परिषदेला निधी दिला तो ही परत गेला होता याचा विसर विखेंना पडला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनी विखे यांची दोन महिन्यापूर्वी प्रशासनावरच आपली गाडी घसरली होती. आमचे कोणी ऐकत नाही असे सांगुन त्यांनी प्रशासनाला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. बहुदा विखेंचा दराराच कमी झाला हे यातून सिद्ध झाले आहे , असे सर्वत्र बोललेही जात होते ते आता खरे वाटू लागले आहे. विकास कामांना प्राधान्य देण्यापेक्षा, दिलेला निधीचा योग्य पद्धतीने उपयोग कसा होईल यात लक्ष घालण्यापेक्षा प्रत्येकांवरच संशयाची सुई उगारल्यामुळेच अशी अवस्था जिल्हा परिषदेतील सत्त्ताधार्यांची झाली की काय असा प्रश्?न निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेला विकास निधी मिळत नाही म्हणुन यांच्याच बगलबच्यांनी आंदोलनाचा इशारा दिला व पालकमंत्र्यांवर तेव्हाही आरोप करुन आपली राजकिय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. पण राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांनी बहुदा काळाची पावले ओळखुन पालकमंत्र्यांबरोबर बैठक घेवुन आपण विषय मार्गी लावू असे सांगितल्यावरच तात्काळ पालकमंत्र्यांनी बैठक घेतली व निधी उपलब्ध केला. हि वस्तुस्थिती लपवुन राहिली नाही. पण स्व:तच्याच विकासाची कामे पूर्ण न करता, येथेही राजकारण विखे घराण्यांनी केले अनेकांना डावलले त्यातुनही काहींना डावा-उजवा अशी वागणूक दिली हे विखे यांना कितपत शोभते? असा सवाल बेरड यांनी केला आहे.स्वत: चे अपयश झाकण्यासाठी पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना विखेंकडून दिसू लागला आहे. असा आरोप भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा भानुदास बेरड यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेत विखेंची सत्ता आल्यानंतर कामांना ब्रेक : भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 5:51 PM