जामखेड : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांची गुंडगिरी व दहशत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे मोडीत निघाली. त्यामुळे जनतेने मोकळ्या वातावरणात मतदान करून तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीला सत्ता दिली. माजी मंत्र्यांच्या स्वत:च्या गावात राष्ट्रवादीच्या विचाराची एकतर्फी सत्ता आली आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केले.
जामखेड तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्ता वारे, कर्जत-जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शरद शिंदे, शहराध्यक्ष अमोल गिरमे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी भोसले, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय काशीद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, मनसेचे तालुकाध्यक्ष हवा सरनोबत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, विजय गोलेकर, विश्वनाथ राऊत, बबनकाका काशीद उपस्थित होते.
पवार म्हणाले, जामखेडच्या जनतेने कुठल्याही दबावाला बळी न पडता, दडपशाही व विरोधकांच्या दादागिरीला न जुमानता विकासात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या उमेदवारांना निवडून दिले आहे आणि हीच खरी लोकशाही आहे. विरोधकांनी जनतेची कायमच फसवणूक केलेली आहे. ते विविध माध्यमातून दिशाभूल करणारे मेसेज करत आहेत. आम्ही जनतेचा विकास हा केंद्रबिंदू मानलेला आहे.