अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्यभरातील पोलिसांना ब्रेथ ॲनालायझर यंत्राचा वापर करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे मद्यपी वाहन चालकांची तपासणी करण्यासाठी असलेली ही यंत्रे सध्या धूळखात पडून आहेत. यावर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीचा मार्ग निवडला असला तरी तुलनेत कारवाईचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे मद्यपी वाहन चालक सध्या सुसाट आहेत.
रस्त्यावर दारू पिऊन वाहन चालविल्याने बहुतांश वेळा अपघात घडतात. अशा मद्यपी चालकांना शोधण्यासाठी ब्रेथ ॲनालायझर या यंत्राचा चांगला उपयोग होतो. या यंत्राच्या माध्यमातून एकाचवेळी अनेक अनेक मद्यपींवर कारवाई करणे सोयीचे होते. कोरोनामुळे हा वापर थांबल्याने पोलिसांनी एखादा मद्यपी वाहन चालक पकडला तर त्याची शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी करावी लागते. ही वेळखाऊ प्रक्रिया असते. या अडचणीमुळे कोरोना काळात मद्यपी वाहन चालकांवर कारवाईचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे. २०२० या वर्षांत जिल्ह्यात १ हजार ३५८ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र यातील सत्तर टक्के कारवाई या पहिल्या तीन महिन्यात झालेल्या आहेत. नगर शहरासह जिल्ह्यातील महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. बहुतांशी वाहन चालकांना दारुचे व्यसन असते. रात्री मद्यपान करून वाहन चालविल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कोराेनामुळे ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद असल्याने पोलिसांचीही अडचण झाली आहे.
--------------------------
मद्यपी आता थेट रुग्णालयात
ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद झाल्याने नगर शहर वाहतूक शाखेने पारंपरिक पद्धत सुरू केली आहे. मद्यपी चालकाला पकडल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात नेऊन तपासणी केली जाते. तो मद्य पिलेला असेल तर त्याच्याविरोधात कारवाई करून न्यायालयात पाठविले जाते. न्यायालयातून त्याच्यावर दंडात्मक कारवाई होते.
------------------------
लॉकडाऊनमध्ये वाढला दारुचा काळाबाजार
लॉकडाऊनमध्ये परवानाधारक दुकानांतून मद्य विक्री बंद असली तरी प्रत्यक्षात या काळात मद्याचा मोठा काळाबाजार झाला. ग्रामीण भागात गावठी दारू विक्रीचे प्रमाण वाढले. त्यामुळे व्यसनी वाहन चालकही कोणत्यातरी मार्गाने दारू पितच होते. लॉकडाऊनमध्ये बहुतांश काळ रस्त्यावर वाहने आणण्यास बंदी होती. त्यामुळे बहुतांश मद्यपी वाहन चालकही घरीच होते. त्यामुळे या काळात अपघातांचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे.
------------
कोरोनामुळे ब्रेथ ॲनालायझर वापरास बंदी असली तरी तपासणी दरम्यान मद्यपी वाहन चालकांची रुग्णालयात तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहन चालकांनी दारू पिऊन वाहन चालवू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
- विकास देवरे, नगर शहर वाहतूक निरीक्षक
फोटो १२ दारु १, दारू २