अहमदनगर: जमिनीची मोजणी करून नकाशा देण्यासाठी शेतक-याकडून दहा हजार रुपयांची लाच घेणा-या श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकाला शनिवारी (दि़७) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली़ बाबूराव यादव राशीनकर (वय ५५) असे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे़ तक्रारदार शेतकºयाला त्याची भोकर (श्रीरामपूर) येथील शेतजमीन बिगरशेती करून घेण्यासाठी मोजणी करून नकाशा हवा होता़ यासाठी त्यांनी ३० जून रोजी भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता़ त्यासाठी त्यांनी शासकीय शुल्कही भरले होते़ हा अर्ज कार्यालयाकडून रद्द झाला होता़ याबाबत शेतक-याने राशीनकर याची भेट घेतली तेव्हा त्याने पुन्हा चलन भरून देण्याचे सांगत २० हजार रुपयांची लाच मागितली़ याबाबत सदर शेतक-याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली तेव्हा राशीनकर याने सदर शेतक-याकडून तडजोडीअंती भूमिअभिलेख कार्यालयात दहा हजार रुपये स्वीकारले़ यावेळी पथकाने राशीनकर याला रंगेहात अटक केली़ ही कारवाई पोलीस उपाधीक्षक हरिष खेडकर, निरीक्षक शाम पवरे, दीपक करांडे, हेड कॉन्स्टेबल तनवीर शेख, पोलीस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, रवींद्र निमसे, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने केली़
शेतक-याकडून लाच घेणारा लिपिक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 7:10 PM