सुधीर लंकेअहमदनगर: देशभर गाजत असलेल्या राफेल विमान खरेदी प्रकरणात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही उडी घेतली आहे. याचा अभ्यास करत असून या करारातील सत्य बाहेर आणू, असे त्यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखतीत सांगितले. राफेलप्रकरणी आरोप होत असल्याने सरकारने खुलासा करायला हवा, असेही ते म्हणाले.
लोकपाल व लोकायुक्तची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करा, या प्रमुख मागण्यांसाठी हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन सुरू करणार आहेत. या वेळी आपण आंदोलनात कोणालाही सोबत घेतले नसून जनतेसोबत एकला चलो रे मार्गाने आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. राफेल प्रकरणात आरोप होत असल्याने मोदी सरकारने खुलासा करायला हवा. आम्ही अनियमितता केलेली नाही, असे त्यांनी जाहीरपणे सांगायला हवे. ते बोलत का नाही, हा प्रश्न आहे. याबाबत कॉंग्रेस-भाजप झगडत आहेत. आपला या कोणाशीही संबंध नाही. मी राफेल प्रकरणाचा अभ्यास सुरु केला आहे. अभ्यासाअंती हा सूर्य व हा जयद्रथ दाखवत सत्य बाहेर आणू, असेही ते म्हणाले.
लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत मोदी सरकारने आपणाला गत २९ मार्चला लेखी आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतरच आपण दिल्लीतील आंदोलन थांबविले होते. मात्र ना मोदींनी लोकपालची अंमलबजावणी केली, ना फडणवीस यांनी लोकायुक्त कायदा लागू केला. हे लोक बोलतात तसे वागत नाहीत. मोदी यांचे खाण्याचे व दाखवायचे दात वेगळे आहेत. हे सरकार हुकूमशाहीकडे निघाल्याचे जाणवत आहे. लोकपालाला पंतप्रधानांच्याही चौकशीचे अधिकार असल्याने सरकार घाबरत आहे, असे ते म्हणाले.
साहित्य संमेलनाच्या आयोजकांवर टीकासाहित्यिका नयनतारा सहगल सरकारविरोधात भाषण करतील म्हणून त्यांचे निमंत्रणच रद्द करायचे ही कसली लोकशाही? एखाद्याचा आवाज बंद करणे ही हुकूमशाही आहे, अशी टीका हजारे यांनी केली आहे.मोदी कान कापतील म्हणून फडणवीस गप्पराज्यात आम्ही नवीन कायद्याप्रमाणे लोकायुक्त आणू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेवर येण्यापूर्वी म्हणाले होते. पण, सत्तेवर आल्यानंतर त्यांनीही अंमलबजावणी केली नाही. फडणवीस यांची इच्छा असली तरी ते काहीही करु शकत नाहीत. ‘चूप बैठो नही तो कान काटूंगा’ अशी त्यांची अवस्था दिसते, अशी टीकाही हजारे यांनी केली.