इंग्रजांनी रतनगड-कात्राबाईची खिंड-कुमशेत-पाचनई हरिश्चंद्रगड अशा प्रवासासाठी रतनगड रस्ता तयार केला होता. ही वाट दुर्लक्षित झाली. अनेक ठिकाणी या वाटेची दुरवस्था झाली. सध्या क्वचितच या वाटेने ट्रेकर्स, पर्यटक जात असतात. या पाऊल वाटेने जाताना रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर दिसते. भंडारदरा धरणाचा जलाशय, लांबवर असलेला अलंग, मदन, कुलंग हे गड आणि कळसुबाई शिखरही दृष्टिक्षेपात येते. पुढे करवतीच्या पात्याप्रमाणे असणारी कात्राबाईची खिंड याच रस्त्यावर आहे. येथून घनचक्करचा डोंगर दिसतो. या खिंडीतून ही पाऊलवाट कुमशेत गावात उतरते, तशीच पुढे पाचनईपर्यंत जाते.
मात्र या पाऊल वाटेची दुरुस्ती झाल्यास परिसरात भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांचा आणि ट्रेकर्सचा ओघ वाढेल आणि पर्यटनास चालना मिळेल. हा हेतू ठेवत हरिश्चंद्रगड वन्यजीव विभागाने ही वाट दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यादृष्टीने आपल्या वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्यामुळे या पाऊल वाटेच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
................
कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर म्हणजे निसर्ग सौंदर्याचा खजिना आहे. भंडारदरा, कळसुबाई परिसरातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तेथे गर्दी करत असतात. रतनगडावर येणाऱ्या पर्यटकांना तसेच ट्रेकर्सला याच गडावरून पुढे हरिश्चंद्रगडाकडे जाण्यासाठी इंग्रजकालीन पायवाट आहे. या वाटेवर अद्यापही ब्रिटिशांनी रोवलेले मैलाचे चिरे कायम आहेत. ही पायवाट दुरुस्त केल्यास पर्यटकांना सोयीचे होईल आणि कुमशेत परिसरातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येईल. या दृष्टीने या पाऊल वाटेची दुरुस्ती केल्यास या परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पहिल्या टप्प्यात या रस्त्यावरील दहा किलोमीटर लांबीच्या दुरुस्तीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून दिवाळीनंतर हे काम सुरू होईल.
- डी. डी. पडवळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, हरिश्चंद्रगड राजूर