अहमदनगर: विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील संस्थामधील काही प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणारे त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ़ अशोक विखे यांना पोलिसांनी उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली आहे़ याबाबत लोणी पोलिसांनी विखे यांना गुरुवारी नोटीस दिली आहे़ अशोक विखे मात्र उपोषणावर ठाम असून तसे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे़ राधाकृष्ण विखे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या खासगी, सहकारी आणि त्यांची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही प्रकरणांच्या चौकशीची मागणी डॉ. अशोक विखे यांनी केली आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी २० मे रोजी लोणी प्रवरा येथील पद्मश्री डॉ़ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे़ याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले आहे़ प्रवरानगर, गणेश, राहुरी या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकºयांना उसाचे पैसे मिळावेत, झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फौंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करावी, जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराचा तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई व्हावी, जिल्हा परिषदेत २००४ ते २००९ या काळा झालेल्या शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराची चौकशी करावी, श्रीरामपूरच्या मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी, या संस्थेला सरकारकडून मिळालेली रक्कम सभासदांच्या खात्यात जमा करावी, या मगण्यांसाठी अशोक विखे यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे़ कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिने डॉ़ अशोक विखे यांना नोटीस देऊन आपल्या स्तरावर उपोषण मागे घ्यावे अशी विनंती प्रशासनाच्यावतीने त्यांना केली आहे़ ते उपोषणावर ठाम राहिले तर २० मे रोजी लोणी येथे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिने योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे लोणी पोलिस ठाण्याचे निरिक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले़
उपोषण मागे घ्या : अशोक विखेंना पोलिसांची विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 5:20 PM