अहमदनगर : भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगजेबाविषयी गौरवोउद्गार काढल्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहमदनगरमधील बीआरएसच्या फ्लेक्सला काळे फासले. फ्लेक्सवर असलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या प्रतिमेलाही काळे फासण्यात आले. दरम्यान पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना अब्दुल कादिर हा चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा पदाधिकारी आहे. कादिर याने औरंगाजेब हा आपला आदर्श असल्याचे म्हटले आहे, असा आरोप करीत अहमदनगरमधील हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगर-मनमाड रोडवरील बीआरएसच्या फ्लेक्सला काळे फासले. यात चंद्रशेखर राव यांच्या प्रतिमेवरही काळे फासण्यात आले.
या आंदोलनात हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हध्यक्ष संजय आडोळे तसेच सचिन पालखे, अविनाश सरोदे, ॲड. भाऊसाहेब काकडे, ऋषी नागरगोजे, विशाल काटे, निखिल धंगेकर, राज सुर्यवंशी, शुभम दारकुंडे, अभिजित झिने, आकाश शेळके, अमोल बारस्कर, समर्थ गोसावी, आदेश खामट, रोहन गीते, प्रसाद भागवत, मनोज फुलारी, जयदीप बारस्कर, आदित्य करपे, कृष्णा गडाख, प्रदीप वारुळे, राज शेलार, करण कातोरे, निखिल बोरकर, ऋषिकेश गुंजाळ, चांगदेव भालसिंग, रुतविक भालसिंग, आशुतोष मेढे, सागर दारकुंडे, गणेश कुसमुडे, सूरज कुसमुडे, राहुल दळवी, प्रशांत मतकर, चेतन राऊत, अजय दराडे, भाऊसाहेब बेरड, ऋषीकेश चव्हाण आदींनी सहभाग घेतला. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.