अहमदनगर : वाडिया पार्क क्रीडा संकुलातील बी विंग इमारत महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमिनदोस्त केली. शनिवारी सकाळी आठच्या सुमारासच ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे मागच्या रविवारी याच इमारतीचा काही भाग पाडण्यात आला होता. परंतु ठेकेदाराने न्यायालयाचा स्थगिती आदेश सादर केल्याने ही कारवाई थांबवण्यात आली होती. वाडिया पार्क येथील क्रीडा संकुलात ठेकेदाराने अनधिकृत इमारत बांधून त्यात गाळे काढले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे नुकताच मनपाच्या आयुक्तपदाचा पदभार आला असून त्यांनी मागील रविवारी ही अनधिकृत इमारत पाडण्याचे आदेश दिले. त्यामुळे मनपाने ही इमारत पाडण्यास सुरूवात केली. परंतु बांधकाम विकासक जवाहर मुथा यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्याला स्थगिती आदेश असल्याचे मनपाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी (दि. १४) सकाळी आठ वाजताच मनपाने पुन्हा ही कारवाई सुरू केली. मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन मनपाचे अतिक्रमणविरोध पथक ही इमारत पाडण्यासाठी दाखल झाले. दरम्यान, विकासकाने पुन्हा मनपाला कारवाई थांबवण्याबाबत सांगितले. मात्र ही कारवाई पूर्ण करण्यात आली. या कारवाईसंदर्भात अवमान याचिका दाखल केलेली आहे. शिवाय अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भातही काही याचिका दाखल झाल्या आहेत. औरंगाबाद खंडपीठात १० डिसेंबरला यासंदर्भात सुनावणी झाली. मात्र यात कोणताही आदेश झाला नसल्याने मनपाने ही कारवाई केली. पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार असल्याचे समजते. काय आहे पेचवाडिया पार्क मैदान हे क्रीडा संकुल समितीला नगरपालिका असताना देण्यात आले आहे. मैदानाचे बांधकाम बीओटी तत्त्वावर विकासक जवाहर मुथा यांना देण्यात आले होते. हे काम अद्यापही अपूर्णच आहे. या मैदानाबाहेर ए व बी अशा दोन इमारती बांधण्यात आल्या असून त्या अतिक्रमणात असल्याचे मनपाचे म्हणणे आहे. न्यायालयाच्या आदेशाने मनपाने यातील ए विंगला सील ठोकलेले आहे. मागील पाच वर्षांपासून हा वाद न्यायप्रविष्ठ आहे.
अहमदनगरच्या वाडिया पार्कमधील ‘ती’ इमारत अखेर जमिनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 2:08 PM