जामखेड : शेजारील आष्टी तालुक्यात बिबट्याने तीन जणांचा बळी घेतला आहे. यामुळे जामखेड तालुक्यात देखील या बिबट्याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. त्यातच तालुक्यातील कुसडगाव येथे लक्ष्मण कात्रजकर या शेतकर्यांच्या वस्तीवरील जनावरावर वन्यप्राण्याने रवीवार मध्यरात्री हल्ला केला असल्याने नेमका हा हल्ला बिबट्याने केला आहे का? याचा तपास वनविभाग करत आहे.
याबाबत माहिती अशी की, कुसडगाव येथील लक्ष्मन कात्रजकर यांच्या वस्तीवर २९ रोजी मध्यरात्री एका वन्यप्राण्याने त्यांची जनावरे बांधली होती. त्या ठिकाणी येऊन अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या जनावराच्या कानाला मोठी दुखापत झाली आहे. सदरचा हल्ला बिबट्यानेच केला आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे कुसडगाव परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
कुसडगावचे पोलीस पाटील निलेश वाघ यांनी जामखेडचे वनरक्षक गांगुर्डे यांना माहिती दिली आहे. त्यानुसार वनविभागाचे वनरक्षक विठ्ठल गांगुर्डे यांच्यासह पथक दाखल झाले आहे. हल्ला कोणत्या प्राण्याने केला याचा तपास वनविभागाचे पथक करीत आहे. मात्र हा हल्ला तरसाने केला असून त्याच्या पाऊलखुणा वरून अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. मात्र नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन माजी सरपंच डॉ. प्रदीप कात्रजकर यांनी केले आहे.