अहमदनगर : बैलगाडा शर्यतींना विरोध करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणा-या प्राणी मित्र अनिल कटारिया यांच्या घरासमोर बुधवारी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्यावतीने बैलांसह आंदोलन सुरु केले आहे. कटारिया यांच्या घरासमोर बैलगाडा संघटनेच्यावतीने बैलं आणून बांधण्यात आली आहेत.नुकतीच राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी सही केली. मात्र, कटारिया यांनी प्राणी संरक्षणाचा मुद्दा उपस्थितीत करीत राज्य सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करु नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात बैलगाडा शर्यत बंदी कायम राहिली आहे, असे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर, विश्वनाथ कोरडे, अंकुश ठुबे, निलेश लंके, गोरख पठारे, बळीराम पायमोडे आदींचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी कटारिया यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात बैलं आणून बांधली आहेत. तसेच कटारिया यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु आहे. या आंदोलनात पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यातील विविध भागातून आलेले बैलगाडा मालक व शेतकरी सहभागी झाले आहेत.दिल्ली गेट परिसरातील शनि मंदिरामागे कटारिया यांचे घर आहे. तेथे हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान कटारिया हे घरी नसल्यामुळे त्यांच्यासोबत आंदोलकांचे फोनवरुन चर्चा सुरु आहे. या चर्चेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, नगरेसवक गणेश कवडे यांच्यासह बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी चर्चा करीत आहेत. डीवासएसपी अक्षय शिंदे हेही पोलीस फौजफाट्यासह आंदोलनस्थळी पोहोचले आहेत.
बैलगाडा शर्यतींना विरोध; अहमदनगरमध्ये कटारिया यांच्या घरासमोर बैलासह शेतक-यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:18 PM