व्हॅलेंटाईन-डे स्पेशल /बाळासाहेब काकडेमी आणि सुजाता वैद्यकीय पदवीच्या शेवटच्या वर्षाला होतो. आमची काश्मीरला सहल गेली होती. काश्मीरमध्येच बहरलेल्या पुष्प महोत्सवात माझी व सुजाताची नजरा नजर झाली. अन् तेथेच आमचे बंध जुळले. त्यानंतर दोन्ही परिवाराची मान्यता घेऊन रितसर विवाह केला, असे श्रीगोंद्यातील डॉक्टर विजय भानुदास बगाडे यांनी सांगितले.डॉ. विजय भानुदास बगाडे व डॉ. सुजाता यादवराव ढोबळे यांनी २० फेब्रुवारी १९७६ रोजी आंतरजातीय विवाह केला. डॉ विजय बगाडे यांचा पारंपरिक कापड व्यवसाय आहे. त्यांना वैद्यकीय सेवेची आवड होती. त्यांना पुणे येथील एका मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. त्याच कॉलेजला मुंबईच्या सुजाता यांनीही प्रवेश घेतला होता. सुजाता या अतिशय हुशार होत्या. त्यांचा स्वभाव तापट होता, तर विजय हे अतिशय शांत, संयमी स्वभावाचे होते. पदवीचे शिक्षण अंतिम टप्प्यात असताना सर्वांना करिअरचे वेध लागले होते. दरम्यान, त्यांची रेल्वेने काश्मीरला सहल गेली होती. त्यावेळी विजय बगाडे यांच्याही मनात सुजाता यांच्याविषयी आपलुकी होती. त्यांच्याविषयी प्रेम होते. मात्र ते व्यक्त केलेले नव्हते. सुजाता यांनाही विजय यांचा स्वभाव भावलेला होता. मात्र दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलेले नव्हते. काश्मिरी पुष्प महोत्सवात दोघांनीही एकमेकांच्या भावना बोलून दाखविल्या व त्यांनी पुढील आयुष्यात सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. दोघांनीही हा निर्णय घरी सांगितला. आंतरजातीय विवाहाला घरच्यांकडून थोडासा विरोध झाला. मात्र त्यांनी समजून सांगिल्यानंतर त्यांचा पुण्यात रितसर विवाह झाला. त्यानंतर त्यांनी श्रीगोंद्यात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यानंतर सन १९७९ मध्ये पल्लवी या मुलीचा जन्म झाला. तीनेही वैद्यकीय व्यवसाय निवडला. ती एमडी झाली असून इंग्लंडमध्ये वैद्यकीय सेवा करीत आहे.डॉ. बगाडे म्हणाले, सध्या चित्रपट पाहून अल्पवयीन मुले प्रेमाच्या नावाखाली आयुष्य बरबाद करून घेत आहेत. मात्र अगोदर स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. आयुष्याचा जोडीदार निवडताना भावनेत वाहून जाण्याऐवजी विचार करायला हवा. घरच्यांच्या भावनांचाही विचार करावा आणि निवडलेल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.
काश्मीरच्या पुष्प महोत्सवात जुळले बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 4:58 PM