शेखर पानसरे, संगमनेर : दोन घरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकुण ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. संगमनेर शहरानजीक असलेल्या अरगडे मळा आणि द्वारकामाई कॉलनी परिसरातील चोरीच्या घटना घडल्या. या प्रकरणी गुरुवारी (दि.२८) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
२७ डिसेंबरला सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास अरगडे मळा येथे चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील २० हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन हजार रुपये किमतीचे अंदाजे ७ भार चांदीचे दागिने, चार हजार रूपये रोख असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी शशांक वाल्मीक झोडगे (रा. अरगडे मळा, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. पोलिस नाईक धनंजय महाले अधिक तपास करीत आहेत.
१६ डिसेंबर सकाळी नऊ ते २५ डिसेंबर दुपारी १.३० वाजेच्या सुमारास द्वारकामाई कॉलनी, घुलेवाडी रस्ता, संगमनेर प्रोफेसर कॉलनीच्या मागील एका घराचा दरवाजा कडी-कोंयडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, बाराशे रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि सहा हजार रूपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी रोहित प्रदीप पहलवान (रा. द्वारकामाई कॉलनी, घुलेवाडी रस्ता, संगमनेर प्रोफेसर कॉलनीजवळ, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. पोलिस हेड कॉस्टेबल जाधव अधिक तपास करीत आहेत.